अपघात : दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाची धडक

दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी

बहुगुणी डेस्क, वणीमारेगाव येथील यवतमाळ हायवेवर एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आज शुक्रवारी दिनांक 20 जून रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गोंविंदराजा कॉटेक्स या जिनिंगजवळ हा अपघात झाला. अमीत भास्कर दर्वे (अंदाजे 24) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

अमीत हा महागाव (सिंधी) ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. तो सकाळी कामानिमित्त महागाव येथून त्याच्या दुचाकीने मारेगाव येथे आला होता. काम आटोपल्यानंतर तो 4 वाजताच्या सुमारास गावी परतत होता. दरम्यान गोविंद कॉटेक्सजवळ त्याच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे तो रस्त्याच्या कडेला पडला. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रस्त्यावरून प्रवास करणा-या लोकांना अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली. तातडीने ऍम्बुलन्स बोलावण्यात आली. अमीतला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ऑफरमध्ये बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

Comments are closed.