बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील एका विवाहितेने पतीसह सासू-दीरविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ, तसेच पैशाच्या मागणीचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. विवाहानंतर पतीने शारीरिक संबंधही प्रस्थापित केले नाहीत, उलट पैशासाठी त्रास दिला, असा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केला असून, पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, सौ. मोना (नाव बदललेले वय 29) या गृहिणी आहे. त्यांचे 2024 मध्ये नागपूर येथील एका तरुणाशी (29) रितीरिवाजाप्रमाणे अरेंज मॅरेज झाले. लग्नानंतर सुरुवातीला सर्वजण तिच्याशी चांगले वागत होते. मात्र, काही दिवसांतच घरगुती किरकोळ कारणांवरून भांडणे सुरू झाली. पती व सासू-दीर यांनी शिवीगाळ करून मारझोड करणे सुरु झाले.
याशिवाय, पतीने लग्नाच्या वेळेपासून एकही शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाहीत. नेहमी पैशाची मागणी करून मानसिक त्रास देत असत, असेही तक्रारीत म्हटले आहे. या छळाला त्रासून मोना या 6 महिन्याआधी माहेरी वणी येथे परत आल्या. तेव्हापासून त्या माहेरीच राहत आहेत. जुलै महिन्यात त्यांनी पतीविरोधात वणी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ते पांढरकवडा येथील महिला समुपदेशन केंद्राकडे पाठवले. तेथे झालेल्या समुपदेशनात कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर पोलिसांनी पती, सासू व दिर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 85 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.



Comments are closed.