बोटोनी परिसरात तुरीवर विल्ट (मर) रोगाचे थैमान

दाणे भरण्याच्या स्थितीत रोग आल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान

सुरेश पाचभाई, बोटोनी: परिसरातील शेत शिवारातील तूर पिकांवर मर (विल्ट) रोग आला आहे. बोटोनी, बुरांडा, खापरी, हटवांजरी, खंडणी, सराटी, घोगुलदरा, जळका, कान्हाळगाव, वागदरा, म्हैसदोडका, रोहपट, मेंढनी, खेकडवाई, खडकी, घोडदरा, शिवणाळा, करनवाडी, सगनापूर इत्यादी शेतशिवारात विल्ट रोगाने तुरीचे पिक प्रभावित झाले आहे. ऐन भरात आलेल्या पिकांवर रोग आल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

परिसरात जून महिन्याच्या दुस-या व तिस-या आठवड्यात तुरीची पेरणी करण्यात आली होती. सध्या तुरीची चांगली वाढ असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी दाणे देखील भरले आहे. मात्र याच काळात पिकावर विल्ट रोगाची लागण झाली आहे. यामुळे झाडांची पानं पिवळी पडली आहे. शिवाय पाने कोमेजून पिक वाळले आहेत. परिणामी फुलोरा सुकला आहे. तसेच दाणे आलेल्या शेंगांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतक-यांचे सुमारे 40 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने हा रोग वाढण्यास पोषक वातावरण मिळाले. 

फुलो-यात फवारणी करणे गरजेचे – एस के निकाळजे
हा रोग वाढू नये म्हणून तुरी फुलोऱ्यात असताना शेतकऱ्यांनी खोडावर तुरीला मेटलॅक्झिन आणि मॅनकोझेप यांचे संयुक्त मिश्रण असलेले रेडोमील हे बुरशीनाशक औषध प्रती लिटर पाण्यात 1 ग्राम मिसळून त्याची खोडावर फवारणी करावी. हा रोग जमिनीतून वाढत असतो. सुमारे 10 वर्षांपर्यंत हा रोग जमिनीच्या माध्यमातून पिकांमध्ये राहू शकतो. त्यामुळे शेतक-यांनी पिकांची जागा बदलवणे गरजेचे आहे. यावर्षी उत्तर दक्षिण पेरणी केली असल्यास पुढच्या वर्षी पूर्व पश्चिम पेरणी करावी किंवा पिकांच्या जागेत बदल करावा. या रोगाबाबत यवतमाळ येथून लवकरच तज्ज्ञ येणार असून ते शेतक-यांना याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
– एस के निकाळजे, तालुका कृषी अधिकारी

जमिनीतून होते या रोगाची लागण
या रोगाची बुरशी तुरीच्या रोपात घुसल्यानंतर हळू-हळू झाडात वाढते व पाने पिवळसर पडतात किंवा शिरांमधील भाग हलका पिवळा किंवा गर्द पिवळा होतो. मूळ चिरले असता मुळाच्या आत मध्ये मध्यभागी हलक्या तपकिरी रंगाची रेघ दिसते. कधी-कधी खोडावर पांढरी बुरशी सुद्धा आढळते. या रोगात झाडाचे शेंडे कोमजतात. झाड बऱ्याच वेळा हिरव्या स्थितीत वाळते. मूळ उभे चिरले असता मुळाचा मध्यभाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते. या रोगामुळे शेतकऱ्याची बरीचशी झाडे वाळल्या मुळे तुरीच्या उत्पादनात घट येते.

हे देखील वाचा:

वणीतील 2 मद्यधुंद तरुणांचा वरो-यात राडा

जिल्हाधिका-यांचा आदेश धडकला, अन् अनेक उमेदवारांचा हिरमोड

Comments are closed.