बसवर पुन्हा दगडफेक, वणी-पाटण बसवर मानकीजवळ दगडफेक

सातत्याने होणा-या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये दहशत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज वणी-पाटण या बसवर मानकी जवळ एका अज्ञात इसमाने दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीच्या समोरील प्रवासी दिशेचा काच फुटला आहे. एकीकडे संपा दरम्यान डेपोतून बसफे-यांमध्ये वाढ होताना दिसत असताना दुसरीकडे बसवर दगडफेकीच्या घटनाही वाढताना दिसत आहे. गेल्या 10 दिवसातील ही बसवरील दगडफेकीची दुसरी घटना आहे. 30 नोव्हेंबर रोजी करंजी जवळ वणी-यवतमाळ बसवर दगडफेक करण्यात आली होती. सातत्याने होत असलेल्या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी दिनांक 30 नोव्हेंबरला बसवर झालेल्या दगडफेकीनंतर बसफेरी थांबली होती. सोमवारी 6 डिसेंबर पासून पुन्हा बसफेरी सुरू झाली. सोमवारी 3 तर मंगळवारी 7 बस डेपोतून धावल्या. आज बुधवारी देखील वणी आगारातून 7 बसेच धावल्या. यात वणी-राळेगाव 2 बस, वणी-पांढरकवडा 3 बस व वणी-मुकुटबन-पाटण 3 बस धावल्या. सकाळी 11 ते 11.30 वाजताच्या सुमारास सर्व बस आगारातून रवाना झाल्या.

वणी-पाटण (MH40 N8464) या बसमध्ये चालक जसराज वासेकर व वाहक सुभाष पुल्लेवार होते. वणीवरून बस घेऊन ते पाटण येथे गेले. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ते पाटण येथून बस घेऊन परत वणी येथे निघाले. दरम्यान 3 वाजताच्या सुमारास वणीपासून अवघ्या 5-6 किमोमीटर अंतरावर असलेल्या मानकी गावाजवळ एका अज्ञात इसमाने बसच्या समोरील काचावर दगडफेक केली. यात प्रवासी दिशेचा काच फुटला. या बसमध्ये 6 प्रवासी होते. या प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

बसवर राग काढू नये – आगार प्रमुख
कर्मचा-यांचा वाद शासनासोबत सुरू आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा राग बसवर काढू नये व बसचे नुकसान करू नये. बसमध्ये त्यांचे सहकारी असलेले चालक वाहक असतात. तसेच मोठ्या संख्येने प्रवासी देखील असतात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. संपक-यांनी शांततेच्या व संवैधानिक मार्गाने आपला लढा लढावा.
–  सुमेध टिपले, आगार प्रमुख

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी दिनांक 29 ऑक्टोबर पासून राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी संप पुकारला होता. वणीतील आगारात दिनांक 4 नोव्हेंबरपासून सुमारे 250 कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. शासनाने पगारवाढ करून कर्मचा-यांना रुजू होण्याचे आदेश दिले आहे. याला प्रतिसाद देत सुमारे 20 टक्के कर्मचारी रुजू झाले आहेत. मात्र इतर कर्मचा-यांचा अद्यापही संप सूरुच आहे. 

हे देखील वाचा:

वणीतील 2 मद्यधुंद तरुणांचा वरो-यात राडा

बोटोनी परिसरात तुरीवर विल्ट (मर) रोगाचे थैमान

Comments are closed.