वणीत वाईन शॉप सुरू… अखेर तळीरामांचा घसा ओला…

वाईनशॉपसमोर मद्यशौकिनांची एकच झुंबड...

0

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमुळे गेल्या दिड महिन्यापासून बंद असलेली मद्य विक्री सुरू करण्यास अखेर प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे आज सकाळी सुजाता (शाम) टॉकीज परिसरातील वाईन शॉपीवर एकच झुंबड उडाली. मात्र आज एकच वाईन शॉप सुरू असल्याने सर्व भार एकाच वाईनशॉपवर आला. परिणामी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. खरेदीसाठी लागलेली रांग चांगली दूरवर जाऊन कमानीच्याही पुढे पोहोचली होती. एकाच वेळी झुंबड उडाल्याने सुरूवातीचा काही काळ सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडाला होता.

वणीतील मद्य शौकिनांची आजची सकाळ आनंद आणि उत्साह घेऊन उजाडली. सकाळी 9 वाजताच्या दरम्यान वणीतील सुजाता टॉकिज जवळील शॉप उघडले गेले. महत्त्वाचं म्हणजे शॉप उघडण्याच्या आधीच मद्यशौकिनांनी तिथे रांगा लावल्या होत्या. शॉप उघडल्याचे कळताच लगेच एकमेकांनी एकमेकांना मॅसेज आणि कॉल करून याबाबत माहिती दिली. त्यामुळे ही रांग आणखीनच वाढली. मद्यशौकिनांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. लोकांनी बंद झाली किंवा किंमत वाढली तर समस्या नको म्हणून आधीच मोठा स्टॉक विकत घेतला.  यावेळी लोक मोठी पिशवी भरून दारूच्या बाटल्या भरून नेताना दिसत होते. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ बंद असलेली मद्यविक्री सुरू झाल्याने मद्यशौकिनांमध्ये आनंद आणि उत्साह दिसत होता. 

पोलिसांचा कडक बंदोबस्त
सुरुवातील पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नसल्याने तिथे एकच गर्दी झाली होती. मद्य खरेदीसाठी लोकांनी एकच गोंधळ केला होता. मात्र गर्दी वाढताच तिथे अतिरिक्त पोलीस बोलवले गेले. पोलिसांनी तिथे योग्य पद्धतीने रांगा लावून दिल्या. त्यामुळे पहिल्या अर्धा तासात उडालेला गोंधळ शांत झाला. सध्या परिस्थिती सामान्य असून लोक शांतपणे मद्याची खरेदी करीत आहे. 

पोलिसांच्या बंदोबस्तानंतर गोंधळ थांंबला . लोकांची शिस्तीत मद्य खरेदी…

सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत मद्यविक्री

सध्या वाईन शॉप, बिअर शॉपी आणि देशी भट्टी यांना मद्य विक्रीची परवानगी मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्यातरी वणीकरांना या तीन ठिकाणाहूनच मद्य खरेदी करता येणार आहे. यासाठी वेळ हा सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतचा ठेवण्यात आला आहे. बारला अद्याप मद्यविक्रीची परवानगी मिळालेली नाही.

एकच वाईन शॉप सुरू

जिल्ह्यातील काही वाईनशॉप धारकाला बुधवारपासून वाईन शॉप सुरू होण्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे सुजाता टॉकिज जवळील शॉपधारकांनी कालच सर्व व्यवस्था करून ठेवली होती. ग्राहकांसाठी आवश्यक असणारे मार्किंगही कालच आखण्यात आले होते. त्यामुळे आज हे शॉप सुरू करण्यात आले. तर दुसरे तुटी कमानीजवळचे शॉप मात्र अपु-या तयारीमुळे तसेच लोकांची झुंबड उडण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरू करण्यात आले नाही.  आज रकाने आखून आणि सर्व तयारी करून उद्यापासून हे शॉप सुरू करणार असल्याची माहिती शॉप मालकाने दिली.

कालच उडाली होती अफवा…

आज सुरू असलेल्या वाईन शॉपतर्फे कालच सोशल डिस्टन्सिंगसाठी मार्किग आखण्यात आले होते. रकाने आखताच वणीत शॉप सुरू होणार अशी एकच अफवा उडाली होती. परिणामी कालपासूनच या ठिकाणी मद्यशौकिनांनी एकच गर्दी केली होती. अखेर ही गर्दी पांगवायला पोलिसांना बोलवण्यात आले, तेव्हा ही गर्दी कमी झाली होती.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.