सावधान व-हाडी ! लग्न सोहळ्यात महिलेच्या गळ्यातील पोत लंपास

लग्नात शिरलेय बिनबुलाये व-हाडी, एका आठवड्यातील दुसरी घटना

बहुगुणी डेस्क, वणी: घुग्गुस येथून वणीला लग्न सोहळ्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना शनिवारी 12 एप्रिलला दुपारी 3 वाजताच्या सुमारास तिरुपती मंगल कार्यालय येथे घडली. सदर पोत ही सुमारे साडे तीन तोळ्याची होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न समारंभात सध्या बिनबुलाये चोरट्या व-हाड्यांचा शिरकाव झाला असून या आठवड्यातील चेन लंपास करण्याची ही दुसरी घटना आहे.

Podar School 2025

सरस्वती भालचंद्र गाताडे (58) या घुग्गुस येथील रहिवासी आहेत. शनिवारी त्या त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाला वणी येथील तिरुपती मंगल कार्यालयात आल्या होत्या. लग्न सोहळ्यात दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सरस्वती यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हातोहात लंपास केली. गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे काही वेळानंतर महिलेच्या लक्षात आले. तिला जबर धक्का बसला. सदर पोत ही साडे तीन तोळ्याची असून ज्याची किंमत 1 लाख 13 हजार 50 रुपये आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सरस्वती यांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 304 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय धीरज गुल्हाने करीत आहे.

भांदेवाड्यानंतर दुसरी घटना
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच भांदेवाडा येथील एका मंदिर परिसरातून चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील चेन लंपास केली होती. त्यानंतर दुस-याच आठवड्यात ही घटना घडली आहे. त्यामुळे लग्नात जाणा-या व-हाड्यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. विशेष म्हणजे दोन्ही महिला या बाहेरगावाहून आल्या होत्या. अद्याप चोरट्याचा सुगावा न लागल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. लग्नात शिरलेल्या या बिनबुलाये व-हाडी असलेल्या भुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments are closed.