गॅस सिलिंडरच्या दराविरोधात महिला आक्रमक, परिसरातील महिलांचा वणीत मोर्चा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गॅस सिलिंडरचे वाढलेले दर कमी करा व इतर मागण्यांसाठी वणीत महिलांनी मोर्चा काढला. मंगळवारी दिनांक 28 मार्च रोजी हा मोर्चा निघाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महिलांच्या मोर्चाला सुरुवात झाली तर मोर्चाची सांगता तहसील कार्यालयात झाली. गॅस सिलिंडरच्या दरात 50 टक्के सुट द्या, खासगीकरण बंद करा, कंट्रोलच्या रेशनचे योग्य वाटप करा अशा घोषना यावेळी महिलांनी दिल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोहच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात वणी व परिसरातील गावातील महिला सहभागी झाल्या होत्या.
दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे परिसरातील महिला मोठ्या संख्येने गोळा झाल्या. यावेळी उपस्थित महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर विविध गावातून आलेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्या प्रमाणे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिट दरात 50% टक्के सूट दिली गेली, त्याच प्रमाणे गॅस सिलिंडरच्या दरातही 50 टक्के सुट दिली पाहिजे, अशी मागणी करीत मोर्चाची भूमिका आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आली. यानंतर मोर्चाला सुरूवात झाली.
प्रचंड घोषणाबाजीत निघालेल्या या मोर्चाची सांगता तहसील कार्यालयात झाली. यावेळी मोर्चाच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदनात गॅस सिलिंडरच्या दरात 50 टक्के सुट द्यावी, खासगीकरण बंद करावे, शेतमालाचा हमीभाव निश्चित करून शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्यात यावा, रास्तभाव दुकानातून रेशनचे योग्य वाटप करावे, निराधारांच्या मानधनात वाढ करण्यात यावी इत्यादी मागण्यांचा समावेश होता.
मोर्चाला वणी, गणेशपूर, राजूर, पळसोनी, झरपट, निंबाळा, कळमना येथील शेकडो महिला उपस्थित होत्या. मोर्चा झाल्यानंतर महिलांनी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांची निवासस्थानी जाऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. जर महिलांना दिलासा मिळाला नाही तर यापेक्षा आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला.
Comments are closed.