जितेंद्र कोठारी, वणी : येथील जैन ले आऊट मधील एका अपार्टमेंटच्या खोलीत अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी आढळला होता. येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम नंतर तरुणीची मृत्यू नैसर्गिक नसून हत्या झाल्याची बाब उघड झाली. वणी पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून घटनेच्या 24 तासांच्या आत मारेकरी प्रियकराला हिंगोली जिल्ह्यातून ताब्यात घेतले. विनोद रंगराव शितोळे (25) रा. शिरोळी, ता. वसमत, जि. हिंगोली असा अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा खून केल्याची कबुली आरोपी प्रियकराने पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील जैन ले आऊट मधील कृष्णा अपार्टमेंटच्या फ्लॅट नं 4 मधून उग्र वास येत असल्याची तक्रार फ्लॅट मालक राकेश डुबे यांनी 29 मे रोजी सकाळी 10 वाजता केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी पंचासमक्ष फ्लॅटचा दरवाजा उघडला असता आतील खोलीमध्ये एका तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पडून दिसला. तसेच फरशीवर रक्ताचे डाग होते. तरुणीची मृत्यू 2 ते 3 दिवस पूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. तरुणीच्या मृतदेहाजवळ वेगवेगळ्या नावाचे दोन आधार कार्ड मिळाले. त्यामुळे पोलीसही संभ्रमात पडले होते.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डोक्यावर मार लागल्यामुळे, तसेच पोटावर व पाठीवर प्रहार केल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरु केला. मृतदेहाजवळ आढळलेले मोबाईलचे कॉल, मेसेज व सोशल मीडियाच्या बारीक तपासणीनंतर पोलिस तपासाची सुई तरुणीचे विनोद नावाच्या फेसबुक फ्रेंडवर जाऊन थांबली. मात्र हा विनोद कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला. तपास अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक माधव शिंदे यांनी गोपनीय माहिती, तांत्रिक बाबी व आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून आरोपीची माहिती काढून आरोपीला हिंगोली जिल्ह्यातून त्याच्या गावातून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृत तरुणीच्या आईच्या फिर्यादवरून आरोपी विनोद शितोळे विरुद्ध कलम 302 भादंवि अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पो. नि. प्रदीप शिरस्कर, सपोनी माधव शिंदे, सपोनी दत्ता पेंडकर, पोउपनि आशिष झिमटे, पोउपनि प्रवीण हिरे, प्रभाकर कांबळे, गजानन होडगीर, अविनाश बानकर, अमोल अन्नेरवार, विजय वानखेडे, इकबाल, सागर सिडाम, भानुदास हेपट, शुभम सोनुले, आकाश अवचारे यांनी शिताफीने तपास करून घटनेच्या 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला.
पोलीस तपासात अनेक प्रश्न अनुत्तरीत?
ब्लाइंड मर्डर असलेल्या या घटनेत पोलिसांनी 24 तासांच्या आत मारेक-या अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली ही दिली, मात्र अद्यापही अनेक प्रश्न पोलीस तपासात अनुत्तरीत आहे. मृतक तरुणी वरोरा येथील रहिवासी असताना मागील तीन वर्षापासून ती वणीत एकटी का राहत होती ? आरोपीने तरुणीची हत्या करण्या मागे नेमके कारण काय ? आरोपीने तरुणीची हत्या कधी केली ? तरुणीचा खून करताना आरोपी सोबत आणखी काही साथीदार होते का ? आरोपीच्या पोलिस कोठडी दरम्यान पोलिसांना वरील प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.