यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढ्याला यश

0

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आला आहे. आधी सोळा पैकी केवळ नऊ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषीत केले होते. वणी विधानसभा क्षेत्रात वणी आणि झरी या दोन तालुक्याला यातून वगळण्यात आले होते. यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त होताना दिसत होता. तर राजकीय पक्षही आक्रमक झाले होते. विविध पक्षांनी या निर्णयाविरोधात दंड थोपटले होते. निवेदन देऊन शिवसेना, मनसे, संभाजी ब्रिगेड, बसपा, भारिप इत्यादी पक्षांनी वणी व झरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करा अशी मागणी केली होती. तर शेवटच्या वेळी काँग्रेसने मुंडण आंदोलन केले. पण यात सर्वात चर्चेत राहिलं होतं ते राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणास डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेलं आमरण उपोषण आंदोलन.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे आंदोलन पुकारले. दिवाळी आधी पदाधिकारी, कार्यकर्ते व वणी मारेगाव झरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन डॉ. महेंद्र लोढा संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा ही मागणी घेऊन आमरण उपोषणाला बसले होते. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पाच दिवस हे आंदोलन चालले. अखेर शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन पोहोचले व त्यांनी लवकरच पुनर्सर्वेशन करून यात वणी आणि झरी तालुक्याचा समावेश करेल असे आश्वासन दिले होते.

आंदोलकांशी चर्चा करताना डॉ. किशोर तिवारी

अखेर शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट मिळाली व संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुष्काळामुळे यावर्षी कापूस, सोयाबिन, तुरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच सततच्या नापिकीने हवालदिल झालेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला. मात्र आता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत झाल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

उपोषण सुटल्यानंंतर जल्लोष करताना

‘वणी बहुगुणी’शी बोलताना डॉ. महेंद्र लोढा यांनी हा सर्व शेतकऱ्यांचा विजय असल्याचे म्हटले आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे ते कायम दुर्लक्ष करतं. त्यामुळे सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग पत्कारला. डॉ. ख्वाजा बेग यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी ऐन दिवाळी तोंडावर असतानाही घरदार सोडून सहभागी झाले. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले. यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य राहिल असेही डॉ. लोढा म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.