अबब…! दोन हजार कोटींच्या मुदती ठेवी असुरक्षीत ?
वणी(रवि ढुमणे): यवतमाळ अर्बन बँकेच्या वणी शाखेने उलाढाल नसलेल्या सेवा इन्फ्रास्ट्रक्चर संस्थेला कोट्यवधी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. इतकेच नव्हे तर कर्ज मर्यादा वाढवून अतिरिक्त कर्जपुरवठा करीत याआधी थकीत कर्जदार असलेल्या सदर संस्थेच्या संचालकांना कोट्यवधींचा कर्ज पुरवठा केल्याने सर्व सामान्य ठेवीदारांच्या मुदती ठेवी असुरक्षित असल्याचे चित्र दिसायला लागले आहे. या बँकेत कर्जपुरवठा व इतर व्यवहारात अनियमितता असून संचालकाने स्वतःच्या फायद्यासाठीच बँकेच्या तथा आयकर विभागाच्या डोळ्यात जणू धुळच फेकली आहे. या संदर्भातील तक्रार येथील ग्राहकांनी पोलीस अधीक्षक व संबंधित विभागाकडे केली आहे.
सहकार क्षेत्रात कमालीची उलाढाल करणारी बँक म्हणून नावारूपास आलेल्या यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत मागेल त्याला कर्ज अशी पद्धत होती. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी ठेवी बँकेत जमा केल्या होत्या. मुदत ठेवी बहुसंख्य होत्या तर कापूस, धान्य या शेतमालाचा मोबदला सुद्धा व्यापारी याच बँकेतून देत होते. सध्या वणी शाखेत मनमानी कारभार सुरू असल्याची चर्चा जोरात आहे. इतकेच नव्हे तर या बँकेच्या संचालकाने तर एका संस्थेच्या (इंफाट्रक्चर) नावावर कर्ज घेऊन ते कर्ज भागीदार असलेल्याच्या नावाने करून परत त्या रकमेला वळती दिशा देत केवळ संचालक पद वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. यात अत्यंत कमी मोल असलेल्या जमिनी ज्यादा दर लावून त्या तारण करीत करोडो रुपये उचल केली आहे.
स्वतःचे नाव मागे ठेऊन शहरापासून लांब असलेल्या गावातील मित्रांच्या मदतीने त्यांची नावे पुढे करीत भूखंड बँकेला तारण दिले आहेत. नियमित ग्राहकांना साधे कर्ज देण्यासाठी बँकेत येरझारा माराव्या लागतात. मात्र इथे थेट संचालकाने अनागोंदी कारभार करीत बँकेचे दिवाळे काढण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ग्राहकांनी प्रशासनाकडे केली असल्याची माहिती आहे. ज्या संस्थेची आर्थिक उलाढाल नाही त्या संस्थेला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठेवीदारांच्या दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवी असुरक्षितच?
सदर सहकारी बँकेत ठेवीदारांच्या जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या मुदती ठेवी आहेत. पूर्वी बँकेची उलाढाल एकदम चांगली असल्याने बहुतांश ग्राहक या बँकेला जोडल्या गेलेत. ग्राहकांनी येथे मुदती ठेवी सुद्धा केल्यात. मात्र वणी येथील बँक संचालकाच्या पूर्वीच्या इन्फ्रास्ट्रक्चर सेवाभावी संस्थेला सदर बँकेने 10 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. इतकेच नव्हे तर अतिरिक्त कर्ज सुद्धा दोन कोटीचे दिले आहे. या संस्थेची कोणतीही आर्थिक उलाढाल नसताना बँकेने एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज दिलेच कसे हा संशोधनाचा विषय आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या संस्थेचा आर्थिक व्यवहार कमकुवत असतांना बँकेने सदर संस्थेला कोट्यवधी रुपयांचे कर्ज बहाल केले आहे. पूर्वी थकीत कर्जदार असलेल्या संचालक मंडळाला कोट्यवधींचा कर्जपुरवठा केल्याने अर्बन बँकेतील ठेवीदारांच्या मुदती ठेवी मात्र असुरक्षितच असल्याचे चित्र दिसायला लागले आहे. परिणामी या अर्बन बँकेत असलेल्या मुदती ठेवी ग्राहकांनी काढायला देखील सुरुवात केली असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
या कर्जपुरवठा प्रकरणात आयकर विभाग व बँकेच्या डोळ्यात जणू धूळफेक केली आहे. आयकर विभागाने सदर संचालकांची व संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर संस्थेच्या कर्जपुरवठा प्रकरणाची चौकशी केली तर मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.