बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहराच्या दक्षिण भागात सुरु असलेल्या जुगाराच्या अवैध खेळांना पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. प्रेमनगर, दीपक चौपाटी व आयटीआय परिसरात एकाच आठवड्यात तीन ठिकाणी पोलिसांनी धाड घातली. या कारवाईत ‘वरली मटका’ व ‘बिस्किट गेम’सह जुगाराचे साहित्य जप्त करून मटका चालवणारे व खेळणा-यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
13 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता वणीतील दीपक चौपाटी परिसरात नगरपरिषद शेडजवळ पोलिसांनी पंचासमक्ष वरली मटका जुगारावर छापा टाकून आरोपी अब्दुल सब्बीर अब्दुल रहमान (वय 52, रा. मोमीनपुरा) याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून 1950 रुपये रोख, पेन व मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3.15 वाजता आयटीआयजवळ नवीनवाघदरा रोडवर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी पुन्हा पंचासमक्ष रेड करून आरोपी प्रथमेश सुरेश कुडमेथे (वय 22, रा. शास्त्रीनगर) याला पकडले व त्याच्याकडून 2820 रुपये रोख, पेन, कार्बन व मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही प्रकरणांत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमनगरमध्ये बिस्किट गेमचा खेळ उघडकीस
11 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, प्रेमनगर येथे एक इसम लोकांकडून पैसे घेऊन तीन प्लास्टिक बिस्किट टाकून हार-जीतचा जुगार खेळवित आहे. पोलिसांनी तात्काळ पंच बोलावले आणि रेड केली. जुगार भरविणारा योगेश शालिक दुर्गे (वय 28, रा. रंगनाथ नगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख व तीन प्लास्टिक बिस्किट जप्त झाले. दोन खेळाडूंना पकडले. त्यांच्याकडूनही रोख जप्त करण्यात आली.
या तीनही कारवायांत पोलिसांनी एकूण 5,000 रुपये रोख रक्कम, मटका चिठ्ठ्या, बिस्किट व जुगार साहित्य जप्त केले. सर्व आरोपींवर बीएनएसच्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास सुरू आहे. वणी पोलिसांनी सांगितले की, जुगाराच्या अवैध खेळांवर कठोर कारवाई सुरू आहे. नागरिकांनी अशा घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.





Comments are closed.