वणी नगरपरिषद विषय समित्यांची घोषणा, शहराच्या विकासाला नवी दिशा
कार्यकाळ 1 वर्ष, उर्वरित नगरसेवकांनाही मिळणार नेतृत्वाची संधी
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर सर्वांचे लक्ष विषय समित्यांच्या स्थापनेकडे लागले होते. अखेर शुक्रवारी दिनांक 16 जानेवारी रोजी ही प्रतीक्षा संपली. नगरपरिषदेच्या सर्व 6 विषय समित्यांचे सभापती, उपसभापती तसेच स्थायी समितीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. नगरपरिषद सभागृहात याबाबत विशेष सभा पार पडली. या सभेचे पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले होते. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शहर भाजप अध्यक्ष ॲड. नीलेश चौधरी, नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम, गटनेते व उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत विषय समित्यांच्या सभापतींची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासनिक तसेच विकासात्मक कामांना नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम समितीची जबाबदारी लवलेश लाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर शहराच्या भविष्यातील विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या नियोजन व विकास समितीचे नेतृत्व लक्ष्मण उरकुडे करणार आहेत. स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी अनिल चिंडालिया यांची निवड करण्यात आली असून शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीची धुरा सोनाली प्रशांत निमकर सांभाळणार आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी रीता महेश पहापळे तर उपसभापतीपदी मनिषा गव्हाणे यांची निवड झाली आहे. शहराची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार काम पाहणार असून, त्यामुळे जलपुरवठा व्यवस्थेवर थेट वरिष्ठ नेतृत्वाचे नियंत्रण राहणार आहे.
सभापतींना एक वर्षांची संधी
राजकीय संतुलन, अनुभव आणि प्रतिनिधित्वाचा विचार करून स्थापन करण्यात आलेल्या या स्थायी समितीमुळे नगरपरिषदेच्या विकासकामांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सर्व विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ 1 वर्षाचा राहणार असून, त्यानंतर उर्वरित नगरसेवकांनाही नेतृत्वाची संधी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यासोबतच नगरपरिषदेची सर्वात महत्त्वाची समजली जाणारी स्थायी समितीही गठीत करण्यात आली आहे. नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम या स्थायी समितीच्या अध्यक्षा असतील. या समितीत लवलेश लाल, लक्ष्मण उरकुडे, राकेश बुग्गेवार, अनिल चिंडालिया, सोनाली निमकर, रीता पहापळे यांच्यासह भाजप नगरसेविका आरती वांढरे आणि अपक्ष नगरसेवक राजू भोंगळे यांचा समावेश करण्यात आला आहे.
नगरपरिषदेत नव्या समित्यांची घोषणा होताच शहरातील विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण तसेच महिला व बालकल्याणाशी संबंधित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा वणीकर नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत असून, आता एका वर्षात सभापतींना आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे.





Comments are closed.