येदलापूर बांधकाम प्रकरणी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’

निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराचा खटाटोप

0

सुशीलओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी सध्या ठेकेदाराचा खटाटोप सुरू आहे. या प्रकरणी नेत्यांनी निवेदन दिले तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र ना पुढे आंदोलन झाले, ना प्रशासनाने कोणती कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणी ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असा तर प्रकार होत नाही ना. अशी खमंग चर्चा सुरू झाली आहे.

खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकामाचे इस्टिमेट 12 लाख 76 हजारांचे होते. या बांधकामात जुडाई व छपाईच्या कामात रेती ऐवजी काळी चुरीचा वापर करण्यात आला. त्यामुळे बांधकाम नित्कृष्ट दर्जेचे झाले. परिणामी या भिंतीला 15 दिवसातच मोठमोठे तडे गेले. याबाबत तक्रार करण्यात आली मात्र ठेकेदाराने प्लास्टिक पेंटचा वापर करून रातोरात भिंतीवरील सर्व भेगा बुजविल्या.

या प्रकऱणी गटविकास अधिकारी पासून तर जिल्हाधिकारी यांच्याकडे तीन वेळा तक्रार करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या झरी येथे झालेल्या बैठकीत पंचायत समिती सदस्या प्रणिता घुगुल यांनी सुद्धा तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. दरम्यान अध्यक्षांनी चौकशीचे आदेश देऊन बांधकाम नित्कृष्ट असल्यास बिल न काढण्याचे आदेश दिले होते.

याबाबत शिवसेनेचे दयाकर गेडाम यांनी सदर कामाची वरपर्यंत तक्रार दिली होती. त्यांनी सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुरावेही सादर केले. कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला होता. मात्र पुढे ना उपोषण झाले, ना आंदोलन झाले. त्यामुळे अधिकारी व अभियंता हे सदर बांधकामाचे लाखो रुपयांचे बिल काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

सदर प्रकरणात अनेकदा वरपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत. अनेक नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उचलून धरला होता. याशिवाय सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पुरावे देखील देण्यात आले होते. असे असतानाही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय परिसरातील नेते मंडळींनी दिलेला आंदोलनाचा व उपोषण इशारा कुठे विरला? आंदोलन, उपोषण हे केवळ दबावतंत्र तर नव्हते? अशी ही शंका उपस्थित केली जात आहे. या संपूर्ण घडामोडीत हे प्रकरण ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे तर नाही, याची खमंग चर्चा सध्या रंगत आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात एकही रुग्ण नाही, आता अवघे 31 ऍक्टिव्ह रुग्ण

अनलॉक होताच तिस-या लाटेसाठी वणीकरांकडून स्वागत…!

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.