‘येंजो’: मेळघाटाच्या वेदनेचा दाह
प्रा. एकनाथ तट्टे यांच्या कादंबरीवर डॉ. पी. आर. राजपूत यांचे परीक्षण
डॉ. पी- आर. राजपूत, अमरावती: वसुंधरेच्या विशाल पसाऱ्यात प्राणी जगताच्या उदयाची प्रक्रिया आरंभ झाली, तेव्हा तिच्या पोषणासाठी वनसृष्टीने अगोदरच आपली कूस समृद्ध केली होती. जंगल म्हणजे खऱ्या अर्थाने प्राणीसृष्टीची जीवनदायिनी.
आदिम समुहांनी हे मर्म फार पूर्वीच जाणले होते. त्यांचा वनदेवतेसोबतचा संवाद अनादी अनंत होता. म्हणूनच त्यांच्या कित्येक पिढ्यांनी वनसृष्टी मायेने जोपासली. तिची राखण केली, तिच्या रक्षणासाठी प्रसंगी जीवाचे बलिदान सुद्धा दिले.
मेळघाट ही सातपुड्याच्या कुशीत दडलेली एक परिपूर्ण वनसंपदा आहे. गडद वनराई, संपन्न डोंगर-दऱ्या, खळाळणाऱ्या नद्या, निर्मल सरिता, उत्तुंग जलप्रपात, निर्भय वन्यजीव निवास, इतिहासाच्या भक्कम पाऊलखुणा आणि महाभारतकालीन घटनांचे संदर्भ मिरवीत, आपल्याच विश्वात रमलेला हा भूभाग अत्यंत मनोहारी आहे.
निसर्गाच्या सप्तरंगानी नटलेले हे विदर्भाचे नंदनवन आहे. आपला हा पोशिंदा सतत असाच डौलत राहावा म्हणून येथील मूल निवासी सदैव सजग असतात. सावध असतात. कारण मेळघाट ही त्यांची इष्टदेवता आहे. हजारो वर्षांपासून आपल्या दैवताशी त्याचा जो संवाद राहिला आहे तो अनन्यसाधारण आहे.
खरंतर हा संवाद त्याची साधना होय. आनंदमय कोशाच्या परमोच्च बिंदूवर मिळालेली ईश्वरीय अनुभूती, त्यातून विकसित केलेली आदिम जीवन पध्दती म्हणजे अलिखित निसर्ग नियमांचा एक परिपूर्ण दस्तावेज ठरते.
सहअस्तित्वाचा समजुतदारपणे सन्मान करणारे जीवन हे स्वानुभवी असते. तो एक ग्रंथच असतो. आपल्या गरजा अत्यंत सीमित असून या सृष्टीतील साधने अपार आहेत हे मूलभूत सूत्र गवसलेला आदिवासी मानवी षडरिपुंनी कधीही ग्रसित झाला नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, यांची त्याला कधीच भुरळ पडली नाही.
निसर्गाच्या कुशीत तो स्वयंभू झाला आणि आपल्याच मस्तीत जगला. बाहेरील बेगडी दुनियेचा त्याला गंधही लागला नाही किंवा मोह सुद्धा झाला नाही. दुसरीकडे तथाकथित सभ्यतेच्या नावाखाली मानव प्राण्याने स्वतःची वेगळी कृत्रीम सृष्टीच जल्माला घातली. पृथ्वीचा जणू तो मालकच झाला. भूमंडळातील हा एकमेव प्राणी आहे, ज्याने वसुंधरेचे तुकडे करून त्यावर आपला मालकी हक्क नोंदविला. सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व्यवस्था आविष्कृत करून सूत्रबद्ध पध्दतीने केलेले शोषण सुद्धा त्याने न्याय्य ठरविले.
त्याने निर्माण केलेल्या भौतिक सुख-सुविधा, त्याच्याच जगण्यासाठी अनिवार्य होऊ लागल्या. अशा संग्रही मनोवृत्तीने तो इतका लोभी झाला, की अख्ख्या सृष्टीलाच त्याने वेठीस धरले. प्राणी व मानव सृष्टीमध्ये एक व्यवच्छेदक रेषा आखली आणि तिला संस्कृती असे नाव दिले.
आजच्या युगात, सभ्यतेचा मुखवटा धारण केलेली शोषण यंत्रणा इतकी जीवघेणी झाली आहे, की माणूसच माणसाचा कर्दनकाळ ठरतो आहे. या प्रकोपाचे चटके सर्वप्रथम जगाच्या पाठीवर आदिम जगताला अधिक तिव्रतेने बसले आहेत. त्यामुळे कित्येक आदिम संस्कृती पूर्णतः नामशेष झाल्या. ही अवनत मनोवृत्ती समृद्ध-सम्पन्न मेळघाटाकडे वळली नसती तरचं नवल!
एनजीओच्या गोंडस नावाखाली तथाकथित समाज सेवकांचा एक सुनियोजित प्रवर्ग उभा झाला. सेवाभावी कार्याला राजकीय पाठबळ मिळणे क्रमप्राप्त असते. काही अभ्यासकांच्या मते तर, एनजीओ म्हणजे एक राजकीय अपत्य आहे.
आपल्या अकार्यक्षमतेविरुद्ध जनक्षोभ उसळण्याधीच त्याला मुळातून शमविण्यासाठीची ही नामी शक्कल आहे. या पार्श्वभूमीवर एक नाव प्रामुख्याने डोळ्यांसमोर येते. ते म्हणजे प्रा. डॉ. एकनाथ तट्टे आणि त्यांची ‘येंजो’ ही कादंबरी. तट्टे हे मेळघाट आणि तेथील जनजीवनावर सामाजिक जाणिवेनं लिहिणारे अत्यंत संवेदनशील लेखक आहेत. मेळघाटातील आदिम जनजीवन, आणि वनसंपदा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय.
‘फागुन’ या पहिल्याच कथा संग्रहातून त्यांनी आपल्या लेखणीची ताकद दाखवून दिली आहे. मेळघाटातील एकंदरीत जनजीवन व सेवेच्या नावाखाली दिवसागणिक वाढत जाणारे आदिवासींचे शोषण, हा त्यांच्या सृजनाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या काही दशकांत मेळघाटातील जनसमूह विस्थापित करण्यासाठी केल्या जाणारे सुनियोजित कारस्थान ‘येंजो’मधून दाहकपणे बाहेर येते. व्यक्तीसापेक्षता बाजूला सारून त्यामागील मनोवृत्तीचा नेमका वेध घेणे ही तट्टे यांच्या साहित्यकृतींची खासियत आहे. हे सातत्य ‘येंजो’ मध्येही तेवढ्याच ताकदीने आविष्कृत झाले आहे.
हे लेखन नवोदिताचं आहे असं कुठेच जाणवत नाही. हीच त्यांच्या सिद्धहस्त लेखनाची खरी पावती होय. ‘येंजो’ म्हणजे मेळघाटातील कोरकू जमातीने एन.जी.ओ. (नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन)चा केलेला मायबोली फॉर्म! मेळघाटच्या गावकुसात, निसर्गावर नितांत श्रद्धा असणारं निरागस स्वाभिमानी समाजजीवन येंजोत मोठ्या खुबीनं चित्रित झालेलं दिसते. सर्वांनी मिळून मोठ्या मायेने जोपासलेली कुटूंब व्यवस्था, सुख-दुःख एक दिलाने झेलणारं वनवासी मन येंजोत पदोपदी निकोप असल्याची ग्वाही देत राहते.
आईच्या मांडीवर लोळायचे असेल तर लहान व्हावे लागते. त्याचप्रमाणे कुठल्याही जन-मानसाचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर स्वतःला विसरून त्याच्याशी एकजीव व्हावे लागते. हेच सूत्र अंगिकारत, लेखकाने मेळघाटलाच आपले निवासस्थान बनविले. कोरकू भाषा त्यांची मायबोली झाली आणि तेथील मूलनिवासी त्यांचे सगेसोयरे झाले. या समरसतेचा प्रत्यय ‘येंजो’त शब्दागणिक येतो.
ही कादंबरी एका विशिष्ट लयीत मेळघाटातील निसर्ग लहरीवर झुलत असल्याची क्षणोक्षणी जाणीव होते. वनसृष्टीच्या अंगाखांद्यावर खेळत, उन्नत झालेली येथील कष्टकरी समाज व्यवस्था त्यातून दृगोचर होते. ज्या झाडावर आपलं जीवन अवलंबून आहे, त्याच्या मुळावर आपण कधीच घाव घालायचा नाही, आवश्यक आहे ते सर्व मिळत असल्याने नाहक त्याची फांदी तोडण्याचा करंटेपणा करायचा नाही, हे बाळकडू मिळालेल्या समाजाचं वास्तव मांडताना लेखकाने तेथील समाज जीवनाचे अनेक पदर मोठ्या खुबीने व लीलया उलगडले आहेत.
‘चमोली’ गाव, गावचा सरपंच ‘म्हातींग’. अनिच्छेने का होईना, आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणारा ‘मुखींया’. कष्टाने संसाराचा गाडा ओढणारा स्वाभिमानी रांगडा कोरकू गडी ‘तुमला’, त्याच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा रथ खेचणारी बायको “हिरय”, आजारी मुलगा ‘चम्पा’, मुलगी “फुलू” आणि म्हातारी आई “गोनाय” यांच्या सुख-दुःखा सोबत, ही कादंबरी हळूच ‘नायिका प्रधान’ होत जाते. तुमलाचं कुटुंब अख्ख्या मेळघाटातील आदिवासी जीवनाच प्रतीक म्हणून कथानकाच्या केंद्रस्थानी येते. लेखकाने या टप्प्यापर्यंतचा प्रवास असा काही मनोवेधक घडविला आहे की, वाचकाच्या मनात मेळघाट नुसता भिनत जातो.
स्वातंत्र्यानंतर देशातील गोरे इंग्रज गेले आणि काळ्या इंग्रजांचा अंमल सुरू झाला. राजकीय व प्रशासकीय मंडळीला मेळघाटची वनसंपदा म्हणजे ‘बेवारस खजिना’ वाटला. आदिवासींचा विकास’ हेच आमचे ‘ब्रीद’ म्हणणाऱ्या ‘एनजीओं’नी आपली दुकाने थाटली. देश-विदेशातून मोठ मोठ्या देणग्या मिळवून तथाकथित ‘सेवाव्रती’ गब्बर झाले. खिस्त्री मिशनरी व त्यांच्यासारखेच प्रलोभन देऊन धर्मपरिवर्तन कणाऱ्यांनी इथे उभा हैदोस मांडला.
असं चित्र निर्माण केल्या गेलं, की मेळघाटातील आदिवासी बांधव आता फक्त आमच्यामुळेच प्रगत होतील. झालं मात्र उलटच! मेळघाटचा मूलनिवासी ‘लंगोटी’वरच राहिला अन प्रगतीचं गाजर दाखविणारांच्या बुडाखाली ‘एअर कंडिशंड’ गाडी आली. या वळणावर कथानकात ‘येंजो साहेब’ या पात्राचा प्रवेश होतो. प्रथमदर्शनी प्रभावी व्यक्तिमत्त्व, भाषेवर प्रभुत्व असणारा, मात्र तेवढाच छद्मी, मुक्तभोगी आणि चालबाज माणूस!
चमोलीत, त्याची ये-जा असते, खेळ स्पर्धा, फागुन रंगोत्सव, मेघनाथ उत्सव इत्यादी प्रसंगी जाणीवपूर्वक पैशांची उधळण करीत खाण्या-पिण्याची चंगळ उडवायची. त्यामागील छुपा ‘अजेंडा’ म्हणजे अर्थातच गावकऱ्यांवर आपली मोहिनी कायम ठेवायची. इकडे तुमला व हिरय अंधश्रद्धेपोटी आजारी ‘चंपा’ बरा व्हावा म्हणून, नवस कबूल करतात. त्यासाठी आवश्यक ‘काळा कोंबडा’ तुमला महत्प्रयासाने मिळवितो. आता नवस फेडला की, ‘चम्पा’ बरा होईल या आनंदात तो घराकडे निघतो. पण स्पर्धेच्या मिरवणुकीत बेधुंद येंजो साहेबांच्या तो नजरेस पडतो.
त्याच्याकडून काळा कोंबडा जबरदस्तीने साहेब हिसकावून घेतो आणि रात्री मैत्रिणीसोबत पार्टी करतो. तिकडे, त्याच रात्री ‘चम्पा’ शेवटचा श्वास घेतो. ‘हिरय’ जीव पिळवटून टाकणारा टाहो फोडते, ‘फुलू’ भावाच्या मरणाने थिजून जाते, आजी ‘गोनाय’ शहारते आणि ‘तुमला’ जीवाला चरे पाडणारा आक्रोश करतो.
या भेदक प्रसंगातील हिरयचे आक्रांदन वाचकाला अंतरर्बाह्य हादरवून टाकते. चम्पाचे अवेळी जाणे, हिरयच्या जीवनात एक भयानक पोकळी निर्माण करते. तरीही दुःख बाजूला सारून मरणोत्तर क्रिया कर्म परंपरेनुसार पार पाडणे तिला भाग पडते. या दुःखद प्रसंगाचा ‘गुन्हेगार’ येंजो साहेब एक वेगळीच शक्कल लढवितो.
संस्थेच्या मिशनरी बाबा कडून पन्नास हजार रुपयांची मदत तुमलाला देण्याचं जुगाड करतो. विपरीत घडलेच नाही या अविर्भावात चंगळ पार्ट्या परत सुरू करतो. एक दिवस हा ‘हिकमती’ साहेब चमोलीत तुमलाच्या घरीच पार्टीचा बेत रचतो. मद्यधुंद अवस्थेत त्याची नजर हिरय’वर पडते. यावेळी तुमला जो रुद्रावतार धारण करतो, खरंतर त्यातून साहेबाची सुटका अशक्य व्हावी. पण तो बचावतो सरपंच म्हातींग मुळे.
मात्र या घटनेतून तुमलाच्या मनात गैरसमज निर्माण होऊन तो निष्पाप हिरयवरच आरोप करतो. शंकेचे भूत त्याच्या मानगुटीवर बसते आणि निर्व्यसनी तुमला आकंठ दारूत बुडतो. भरल्या संसाराची राखरांगोळी होताना पाहून हिरय पूर्णपणे उन्मळून पडते. सुधारेल तो साहेब कसला. त्याचे कृष्ण-कारस्थानी डोके प्रचंड वेगाने सक्रिय होते.
मेळघाटातील राजकारणी, समाजकारणी, सेवाभावी संस्था, पत्रकार, मेळघाटबद्दल खरी आस्था असणारे शैक्षणिक क्षेत्रातील मित्र इत्यादींना भेटणे, वर्तमानपत्रातून स्वतःच्याच संस्थेबद्दल खोटा मजकूर छापून आणणे, त्यातून सदविचारी मिशनरी बाबांचा काटा दूर करणे आणि सरतेशेवटी आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रत्यक्ष ‘हिरय’लाच तीची सहमती नसताना तो उमेदवार घोषित करून टाकतो.
साम, दाम, दंड,भेद नीतीचा वापर आणि चम्पाच्या मरणाची सहानुभूती मिळवून हिरयला विजयी करण्यात तो यशस्वी होतो. हा घटनाक्रम येंजो साहेब इतक्या वेगाने व चालबाजीने घडवून आणतो की, हिरय नुसती बघ्याची भूमिका बजावते. भांबावलेल्या हिरयला काही कळायच्या आत पंचायत समितीची ‘सभापती’ केल्या जाते. आता हिरय सभापतीच्या खुर्चीत तर येंजो साहेब तिच्या बाजूच्या खुर्चीत सर्व फायलींचा मालक म्हणून विराजमान होतो.
पण म्हणतात ना, ‘जैसी करणी वैसी भरणी’. या उक्तीला सार्थक करणारा कादंबरीचा पुढील घटनाक्रम आश्चर्याचे धक्के देत वाचकाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून ठेवतो. हिरयला नामधारी सभापती बनवून साहेब निवडणुकीत केलेला खर्च सर्व नियम धाब्यावर ठेवत पंचायत समितीच्या विविध योजनांमधून पुढील दहा पिढ्या बसून खाऊ शकतील इतका वसूल करायचा, परिसरातील राजकारण व प्रशासन बोटावर नाचवायच आणि संधी मिळताच हिरयच्या शरीरावर ताबा मिळवायचा, असा त्याचा मनसुबा असतो.
पण येंजो साहेबाचे हे षडयंत्र कितपत पूर्णत्वास जाते, या कारस्थानी मनोवृत्तीचा शेवट काय होतो, ‘फुलू’ नेमकी कुठे आहे, आणि महत्वाचे म्हणजे मेळघाटातील मूलनिवासी बांधवांच्या स्वप्नांचे काय होते? या सर्व प्रश्नांची उकल करताना लेखकाचे शेवटच्या टप्प्यातील ‘कसब’ कादंबरीला एक अनोखे साहित्यिक मूल्य प्रदान करून देते.
वेदनांचा मार्मिक दाह
प्रा. एकनाथ तट्टे यांची ‘येंजो’ ही कादंबरी म्हणजे, मेळघाटातील आदिम बांधवांच्या निरागस जीवनात तथाकथित सभ्य म्हणविणाऱ्यानी पेरलेल्या वेदनांचा मार्मिक दाह आहे. हा दाह वाचकाला शेवटी अंतर्मुख करून जातो. सुप्रसिद्ध कादंबरीकार डॉ. मधुकर वाकोडे यांची मलपृष्ठावरील प्रतिक्रिया अत्यंत आश्वासक व समर्पक आहे. आणि म्हणूनच प्रा. एकनाथ तट्टे हे मेळघाटातल्या जीवनावर भेदक भाष्य करणारे नव्या पिढीतले आश्वासक साहित्यिक म्हणून पुढे येत आहेत. कादंबरी आणि कथाविश्वात त्यांचा दर्जेदार पल्ला अधिक रुंदावत जाईल यात शंका नाही.-डॉ. पी. आर. राजपूत
9325252121
कादंबरी: येंजो
लेखक: प्रा. डॉ. एकनाथ तट्टे (9404337944)
प्रकाशक: साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर
पृष्ठे: 191
किंमत: ₹ 250/-
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)