विवेक तोटेवार, वणी: एक वृद्ध महिलेला परिसरातीलच एका तरुणाने मारहाण केल्याचा अमानुष आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रंगारीपुरा येथे गुरूवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदाबाई बाळकृष्ण तेजे (68) या रंगारीपुरा येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याच वार्डात आरोपी गणेश रमेश मोहबिया (22) हा राहतो. गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास आरोपी गणेश मंदाबाई यांच्या घराजवळ दारू पिऊन आला. दारुच्या नशेत त्याने मंदाबाईशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यावर मंदाबाईने त्याला हटकले असता त्याने मंदाबाईस मारहाण करण्यास सुरूवात केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत मंदाबाईच्या हाताला दुखापत झाली आहे
मारहाण झालेल्या वृद्धेने याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेत पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी आरोपी गणेश मोहबिया विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गणेश विरोधात भादंविच्या कलम 323, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस ठाण्याचे सोमेश्वर कुमरे करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)