उकणीतील तरुणाने पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेतल्याचा संशय
घटनास्थळी आढळून आली बाईक आणि मोबाईल
जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास पाटाळाच्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर तरुणाचा मोबाईल व बाईक पुलावर आढळून आला आहे. मोबाईलवरून माहिती काढली असता बेपत्ता झालेला तरुण उकणी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू असून अद्याप तिथे कुणाचाही शोध लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास पाटाळ्याच्या पुलावर स्थानिकांना व पुलावरून वाहतूक करणा-यांना मोबाईल व बाईक (MH 29 BN 9419) आढळून आली. त्यावरून तिथून कुणीतरी उडी घेतल्याचा त्यांना संशय आला. स्थानिकांनी बाईक व मोबाईलवरून माहिती काढली असता त्यांना तो मोबाईल उकणी येथील एका तरुणाचा असल्याची महिती मिळाली.
तरुणाचे नाव ईश्वर शिवशंकर शुक्ला असून तो सुमारे 23 वर्षांचा आहे. तसेच उकणी येथे तो हजर नसल्याने बेपत्ता झालेला तरुण ईश्वरच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळावरील लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्याच्या नातेवाईकांनी संध्याकाळी नदी पात्राच्या ठिकाणी शोध घेतला. मात्र तिथे तो आढळून आला नाही. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनलाही माहिती दिली.
बेपत्ता तरुण ईश्वर शुक्ला हा उकणी येथील रहिवाशी आहे. तो गावातच त्याच्या आईसोबत राहतो. एका ट्रान्सपोर्ट कंपनीत तो काम करत असल्याची माहिती आहे. 16 तारखेला तो 24 तासाची ड्युटी करून घरी आला होता. संध्याकाळपर्यंत तो गावातच होता. मात्र संध्याकाळी उशिरा ईश्वरने पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेतल्याची माहिती गावक-यांना चर्चेतून मिळाली. सध्या ईश्वर बेपत्ता आहे. घटनेच्या दिवशी सकाळी त्याच्या लग्नासंबंधी त्याचे आईशी बोलणे झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नदीत ईश्वरने उडी घेतली हे अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याने नदीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय त्याने नदीत उडी घेतली, की तो बाईक आणि मोबाईल पुलावर ठेऊन तिथून निघून गेला हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी आढळून आलेली बाईक ही ईश्वर ऐवजी दुस-या व्यक्तीच्या नावे आहे. दरम्यान नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
10 दिवसांतील उकणी येथील ही दुसरी घटना
दिनांक 7 सप्टेंबर रोजी उकणी येथील आकाश दरवेकर (27) याने मोहुर्ली येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या शेजारीच राहत असलेल्या ईश्वरने पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेतल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यातच दिनांक 10 सप्टेंबर रोजी कोना येथील आचल शंकर परचाके व ज्योती श्रीकृष्ण परचाके या दोघा चुलत बहिणी कपडे धुवत असताना पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेल्या होत्या. यातील आचलचा मृतदेह आढळून आला तर ज्योती ही माजरी परिसरात नदीच्या किनारी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. या घटनेच्या दुस-याच दिवशी घुग्गुस येथील वेकोलि कार्यरत एका कर्मचा-यानेही याच पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. सध्या उकणीतील ईश्वर शुक्ला हा नदीवर मोबाईल व बाईक ठेवून बेपत्ता झाला आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)