आज 9 पॉजिटिव्ह तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू

दोन दिवसांत रुग्णसंख्या कमी, मात्र वाढत्या मृत्यूमुळे दहशत....

0

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 9 रुग्ण आढळून आलेत. तर वणीतील एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 2 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 493 झाली आहे. दरम्यान शहरातील शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव हा चिंतेचा विषय आहे. पोलीस, वाहतूक, आरोग्य, पंचायत समिती, कोर्ट, महसूल, वेकोलि इत्यादी नंतर आता नगर पालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना योद्धा म्हणून कार्यरत व्यक्तींना कोरोनाची लागण होत असल्याने प्रशासनावरचा ताण वाढला आहे. काल जिल्हाधिकारी यांनी शहरातील 51 व तालुक्यातील 3 असे एकूण 54 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्याचे जाहीर केले होते. मात्र स्थानिक प्रशासनाने 13 व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे जाहीर केले होते. रुग्णांच्या आकड्यांच्या घोळामुळे काही काळ ‘जनता कन्फ्यूज’ दिसून आला व त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या निमित्ताने आरोग्य विभागाचा गलथानपणा समोर आला आहे.

आज यवतमाळहून 43 अहवाल प्राप्त झाले. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 36 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. याशिवाय आज 16 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 14 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 124 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात 493 पॉजिटिव्ह व्यक्ती झाल्यात. यातील 335 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 146 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 11 झाली आहे.

आज एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू
आज एकूण 9 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. यातील शहरातील पानघाटे ले आउटमध्ये 2 तर सेवानगरमध्ये 1 व देशमुखवाडीत 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात भालर येथे 2, गणेशपूर 2, चिखलगाव 1 रुग्ण आढळून आला आहे. तर वणीतील एकता नगर येथील रहिवाशी असलेल्या एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तालक्यात कोरोनामुळे रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने कोरोनाबाबतची दहशत वाढली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक व वृद्ध भयभीत झाले आहे. 

आज 15 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 15 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 146 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 56 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 90 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 17 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 80 व्यक्ती भरती आहेत.

नगर पालिकेत कोरोनाचा शिरकाव
काल नगर पालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला. पालिकेत कार्यरत जलपूर्ती विभागाच्या एका कर्माचा-याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे काल दोन दिवसांसाठी नगर पालिका कार्यालय सामान्य व्यक्तींसाठी बंद राहणार असल्याची सूचना लावण्यात आली होती. अलिकडे शहरात कोरोनाचा विविध शासकीय कार्यालयात शिरकाव होत आहे. शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे नेहमी कामानिमित्त येणे जाणे सुरू असते. त्यामुळे सर्वसामान्यांसह प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे.

बुधवारी आकड्यांमुळे ‘जनता कन्फ्यूज’
बुधवारी जिल्हा प्रशासनाने वणी तालुक्यात 54 व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे जाहीर केले होते. तर स्थानिक प्रशासनाने 13 व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे जाहीर केले होते. एकीकडे अतिशय कमी रुग्ण तर दुसरीकडे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण असल्याने वणीकरांमध्ये काही काळ चांगलाच गोंधळ उडाला. माहिती काढली असता आरोग्य विभागातर्फे रोज जिल्हा प्रशासनाला माहिती दिली जाते. याआधी दोन चार रुग्णांचा फरक असायचा. मात्र एवढी मोठी तफावत पहिल्यांदाच असल्याने गोंधळ पसरण्यास अधिकच भर पडली. त्यामुळे तालुका आरोग्य अधिका-यांचा जिल्हा प्रशासनाशी असलेला समन्वय कसा आहे हे दिसून आले. आधीच सततच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिक दहशतीत असताना या निमित्ताने तालुका आरोग्य अधिका-याचा गलथानपणा समोर आला आहे. याबाबत आम्ही तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. काल 13 रुग्ण तालुक्यात आढळून आले होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.