जत्रा मैदान परिसरात गांजा ओढणा-या तरुणास अटक

शहरातील ओसाड ठिकाणं बनले गर्दुल्यांचा अड्डा

बहुगुणी डेस्क, वणी: सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणा-या एका तरुणाला वणी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. शुक्रवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री डीबी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

शुक्रवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास खबरीकडून डीबी पथकाला जत्रा मैदानात अंमली पदार्थाचे सेवन होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथक जत्रा मैदान जवळील सार्वजनिक ठिकाणी गेले. तिथे त्यांना एक तरुण चिलम द्वारा धूम्रपान करीत असल्याचे आढळले. पंचासह त्या इसमावर काही वेळ लक्ष ठेवले असता सदर तरुण हा गांजाचे सेवन करीत असल्याचे आढळले. त्यावरून पोलिसांच्या पथकाने घेराव घालून तरुणास ताब्यात घेतले.

पथकाला सदर तरुणाचे डोळे लालसर व तारवटल्यासारखे आढळून आले. तरुणाची चौकशी केली असता तरुणाने तो आदर्श शाळेजवळ राहत असून सदर ठिकाणी तो गांजा ओढत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने तरुणाकडील गांजा ओढण्याचे सर्व साहित्य जप्त केले. पोलिसांनी तरुणावर गुंगीकारक औषधीद्रव्ये अधिनियम 1985 च्या कलम 27 व कलम 8 सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर प्रकरणाचा ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई विकास ढडसे करीत आहे. सदर कारवाई धीरज गुल्हाने, पोकाँ मोनेश्वर, पोकाँ अतुल, पोकाँ विजय यांनी केली. 

शहरातील ओसाड ठिकाणं बनले गर्दुल्यांचा अड्डा
शहरातील अनेक ओसाड ठिकाणी गांजासारख्या मादक द्रव्यांचे सेवन होते. यात शाळकरी मुलांपासून ते कॉलेजच्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. व्यसनाधीन झालेले या मुलांना व तरुणांना अनेक वर्षांपासून गावातूनच गांजा मिळतो. हे सर्व चांगल्या घरातील मुलं असून या व्यसनामुळे त्यांची तरुणाई व्यर्थ जात आहे. गावाबाहेरील अनेक ओसाड लेआऊट, नदी रोडवरील मैदान, ओसाड बगिचा व मैदान हे गांजा फुकण्याचे ठिकाण झाले आहे. पोलीस पथकांनी वेळोवेळी धाड टाकून गांजा ओढणा-यांना अटक केलेली आहे. मात्र त्यानंतरही हे प्रकार सुरूच आहे. पोलिसांनी ड्रग सप्लायर्सवर तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा: 

दिवाळीत नातेवाईकाच्या गावाला आलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

Comments are closed.