जितेंद्र कोठारी, वणी: ऑनलाईनच्या जमान्यात सोशल मीडियाने कहर केला. व्हॉट्सएपच्या माध्यमातून अनेक चांगल्या आणि वाईटही गोष्टी घडत आहे. व्हॉट्सऍपवरून चॅटिंग करता करता केवळ पालकच नाही तर सर्वच चॅट होतील, असा पराक्रम वणी तालुक्यात घडला. व्हॉट्सएपवर मेसेजेस इकडे तिकडे सुसाट फिरवताना एक दिवस ‘ति’च आपल्या ऑनलाईन प्रियकरासोबत बाईकवरून फरार झाली. मात्र त्यांच्या ऑनलाईन प्रेमातून त्यांनी केलेल्या ‘ऑफलाईन’ डेअरिंगचे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे लवकरच ‘ब्रेकअप’ झाले.
‘झुकझुक झुक अगीन गाडी’ म्हणत उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची बात काही औरच असते. अल्पवयीन ‘ती’ सुद्धा काही महिन्यांपूर्वी आपल्या मामाच्या गावी गेली. मात्र तिची गाडी मामाच्या गावी जाताच रुळावरून घसरली. गावातीलच एका तरुणासोबत तिची ओळख झाली. अलवार ‘ती’ ‘त्याच्या’ प्रेमात पडली. सुटी घालवल्यानंतर शेवटी ‘जुदाई’ची वेळ आली. ‘कभी आये ना जुदाई’ म्हणत त्या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केलेत.
मामाच्या गावावरून परत आल्यानंतर त्या पिल्लू आणि बाबूमध्ये व्हाट्सएपच्या माध्यमातून मॅसेजची देवाण घेवाण सुरू झाली. दिवसांमागून दिवस जात होते तसे त्यांचे प्रेमही अधिकच फुलत होते. दरम्यान ‘त्या’ने ‘ति’ला आपल्या जाळ्यात पुरते अडकवले होते. ‘दुरी सही जाये ना’ अशी परिस्थिती झाल्यावर त्यांनी पळून जाण्याचा निर्णय़ घेतला. एक दिवस कुटुंबातील सर्व सदस्य रात्री गाढ झोपेत असताना प्रियकरासोबत ‘लडकी ब्युटीफुल’ बाईकवरून ‘फुर्र’ झाली. यात प्रेमीच्या एका मित्रानेही या युगलांना मदत केली.
मुलगी घरून बेपत्ता असल्याचे कळताच मुलीच्या घरी एकच गोंधळ उडाला. तिच्या वडिलांनी शनिवार 17 ऑक्टो.च्या रात्री वणी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करून वेगाने तपासचक्र फिरविले.
कुणीही कितीही बाईकने दूर जाण्याचा प्रयत्न करो की रेल्वेने. कानूनचे हात त्यांच्या स्पीडपेक्षाही लांब असतात. या प्रेमी युगलांच प्रेम बाईकवरून केवळ ‘नांदेपेरा रोड’पर्यंतच पोहोचलं होतं. दरम्यान पोलिसांचे एक पथक रात्री नांदेपेरा रोडजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ गस्त घालत होतं. त्यावेळी एक मुलगी दोन तरुणासोबत बाईकने जाताना दिसली. त्यांनी थांबवून त्यांची चौकशी केली असता व्हॉट्सऍपवर झपझप मॅसेज करणा-या व्हॉट्सऍप प्रेमीची ततपप सुरू झाली. पोलिसांना संशय आला. त्यांनी माहिती काढली असता त्यांना एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार ठाण्यात नोंद असल्याचे निदर्शनास आले.
मुलीच्या गावाला जावूया…
पोलिसांनी त्या तिघांना वणी पोलीस ठाण्यात आणले. त्यांना विचारपूस केली असता हे संपूर्ण प्रकरण उलगडलं. घोन्सा येथील कुणाल विलास देवतळे (19) या तरुणाचे वांजरी येथील एका अल्पवयीन मुलीवर प्रेम बसले होते. काही दिवसांनी त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याला एका मित्राची गरज होती. त्याने गावातीलच गौरव मनोहर कार्लेकर (20) या मित्राची मदत मागितली. ठरलेल्या दिवशी ते दोघेही वांजरी येथे गेले व त्यांनी तरुणीला पळवून नेल्याची माहिती दिली. तर मुलीनेही आपण स्वतः आपल्या मर्जीने घोन्सा येथील तरूणासोबत गेल्याचे सांगितले.
पोलिसांनी तात्काळ मुलीच्या कुटुंबीयांना मुलगी सापडल्याची माहिती देत त्यांना ठाण्यात बोलवले. मुलीचे वडील व काकांना ठाण्यात बोलावून दक्षता समिती सदस्यांसमोर स.पो.नि. माया चाटसे यांनी मुलीचे बयाण नोंदविले. सुटका करण्यात आलेल्या तरुणीला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना 18 ऑक्टो. रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.
म्हणतात ना की प्रेम आंधळे असते. यात प्रेमीयुगल वाहवत जातात. अल्लड वय असल्याने ते देखील चुकीचा निर्णय घेतात. हे प्रकरणही असेच होते. मात्र मामाच्या गावावरून सुरू झालेली ही व्हॉट्सऍप लव्ह स्टोरी पोलीस मामाच्या गावात जाऊन ‘द एन्ड’ झाली. पोलिसांची समयसुचकता व अलर्टनेसमुळे कोनताही अनर्थ घडला नाही. त्याबाबत वणी पोलिसांचे कौतुक होत आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रताप बाजड करीत आहे.