घरातील कर्त्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आईचा आधार हरवला... बेसा येथील घटना...

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील बेसा (लाठी) येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विनित शैलेश वाघमारे (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या आई व लहान भावासोबत बेसा येथे राहत होता. तो कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तसेच तो घरखर्च चालण्यासाठी एका खासगी ठिकाणी नोकरी करीत होता. सोमवारी दिनांक 6 जानेवारी रोजी विनितची आई ही शेतात कामाला गेली होती तर लहान भाऊ कॉलेजसाठी वणीला आला होता. दुपारी घरी कुणी नसल्याची संधी साधून विनितने गळफास घेतला. दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्याचा भाऊ घरी आला असता ही घटना उघडकीस आली. त्याने याची माहिती आई, गावातील नातेवाईक व शेजा-यांना दिली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. विनतने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. घरातील एक कर्ता व आधार असलेल्या तरुणाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.

Comments are closed.