झरी तालुक्यातील रक्तासाठी झटणारा रक्तदूत

आता पर्यंत 13 हजार रुग्णांना दिले रक्त

0

रफीक कनोजे, मुकुटबन: इतर सर्व गोष्टींना पर्याय आहे, मात्र मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. याची कोणत्याही कारखान्यात निर्मिती करता येत नाही. अनेकदा रक्तपेढीतील रक्त उपलब्ध नसते तर अनेकदा अनेकांना रक्तपेढीतून रक्त विकत घेणे शक्य होत नाही. अशा वेळी रक्त देणारा रक्तदाता कामी येतो. हे रक्तदाता मिळवून देण्याचे कार्य अडेगाव येथील एक रक्तदूत करीत आहे. गोरगरीब लोकांचा रक्ताअभावी जीव जाऊ नये यासाठी हा रक्तदूत रक्त पोहचविण्यासाठी दिवस रात्र झटत आहे. या रक्तदुताचं नाव आहे मंगेश पाचभाई.

आजच्या आधुनिक युगात मोबाईल, फेसबुक,व्हाट्सअपचा वापर मनोरंजनासाठी केला जातो. माहिती पुरवण्याच्या या मीडियाचा वापर अधिक वेळा मनोरंजनासाठी होतो. मात्र सोशल मीडियाचा वापर करून रक्तदाता मिळवून देण्यासाठी हा रक्तदूत वापर करतो. आता पर्यंत त्यांनी तेरा हजार रक्त्ताचे युनिट (शिस्या) शिबिराच्या माध्यमातून रक्तपेढीला दिले असल्याची माहिती मंगेश पाचभाईंनी वणी बहुगुणीला दिली.

मुळचा झरी तालुक्यातील अडेगाव इथला रहिवाशी असलेला 24 वर्षीय युवक मंगेश पाचभाई चंद्रपुर येथे शिक्षण घेतो. चार वर्षापुर्वी एक अशी घटना घडली की मंगेशने रक्तदूत म्हणून काम करण्याचा निश्चय केला. सामान्य रुग्णालयात गर्भवती मातेच्या शरीरात रक्त नसल्याने ती मरण पावली. या घटनेने त्याचे मन सुन्न झाले. दुसऱ्या दिवशी त्याने निश्चय केला आणि त्याने ‘रक्तदान महादान’ नावाने फेसबुकवर एक तर व्हाट्सअप वर विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात गृप तयार केले आहे. विदर्भातील तरुण युवकांना एकत्र करून युवकांची टीम तयार केली. या गृपच्या माध्यमातून रक्तदानाविषयी जनजागृती करून रक्तदान शिबिरे आयोजित केले.

आजच्या घडीला चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात देखील रक्तदान महादान फाऊंडेशनचे काम तो आणि त्याचे मित्र तेवढ्यात ताकदीने करीत आहे. एवढेच नाहीतर अतीदुर्गम, संवेदनशील, गडचिरोली जिल्ह्यात मित्रांच्या साथीने स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान व जनजागृती कार्य सुरू आहे. आतापर्यंत तेरा हजार रुग्णाना रक्तपुरवठा करून अनेकांना जिवनदान दिले आहेत.

वणी येथे रक्तपेढी नाही. त्यामुळे रक्ताअभावी रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूरला उपचारासाठी दाखल करावे लागते. किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाहून रक्त मागवावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन मंगेश आणि त्याच्या मित्रांनी केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांना पत्र दिले. त्यांचा “गाव तिथे रक्तदाते” या संकल्पनेला भरारी देऊन मानवाचे नाते तुटले तरी रक्ताचे नाते कायम ठेवून रक्तदानाचे काम अविरत चालु राहील असे तो सांगतो.

झरी तालुका आदिवासी बहुल आहे. या अतीदुर्गम भागात राहूनही त्यांनी विदर्भात लौकिक मिळवला आहे. झरी, मारेगाव, वणी तालुक्यातील गरजू रुग्णांना सातत्याने मोफत रक्त पुरवण्याचे त्याचे कार्य सुरू आहे. त्याच्या या कामात त्याच्या खांद्याला खांदे लावून गणेश पेटकर, प्रफुल भोयर, शुभम दलाल, वैभव चिंचुलकर, भूषण काटकर, विठ्ठल मांडवकर, हकीम भाई हे कार्य करतात. वणीत लवकरात लवकर रक्तपेढी सुरू व्हावी या साठी हे सर्व प्रयत्नशील आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि परिसराचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी त्यांच्याा मागणीची दखल घ्यावी अशी अपेक्षा ते करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.