सुशील ओझा, झरी: जुणोनीजवळचा घाट बसला पार करता आला नसल्याने प्रवाशांना पायी प्रवास करावा लागला. झालेल्या त्रासामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात आहे. फक्त तिकीट भाडे वाढवता मग योग्य ती सेवा का देत नाही असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास वणी आगारातून वणी ते झरी व्हाया घोन्सा (MH-40 N-8001) ही बस प्रवासी घेऊन निघाली. बसमध्ये जवळपास पूर्ण भरलेली होती. अखेर बस जुणोनी जवळच्या घाटामध्ये पोहोचली. मात्र बसला घाट काही चढताच आला नाही. ड्रायव्हरने घाट चढवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, मात्र बस काही सुरूच झाली नाही. अखेर प्रवासी बसखाली उतरले आणि त्यांनी पायीच प्रवास करून घाट पार केला.
दरम्यान बस पुन्हा सुरू झाली. घाट पार करून पायी जाणा-या प्रवाशांना पुन्हा बसमध्ये घेऊन बस झरीच्या मार्गाने निघाली. मात्र जुणोनीला पोहोचताच बस पुन्हा खराब झाली. इकडे ड्रायव्हर आणि कंडक्टर बस सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे प्रवाशांचा पारा चढत होता. बस सुरू होण्याची चिन्ह दिसत नव्हते. अखेर ड्रायव्हरने बस फेल झाली असे सांगताच प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास करून ते निश्चित स्थळी पोहोचले. दोन वाजेपर्यंत बस तिथेच असल्याची माहिती आहे. केवळ तिकीट दरवाढ करता मग योग्य ती सेवा का देत नाही असा संताप बसमध्ये असलेले रासा येथील प्रवासी श्रीकांत आत्राम यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केला.
वणी विधानसभा अंतर्गत मारेगाव, झरी असे दोन तालुके येत असून वणी येथे शासकीय बस आगार आहे. तीनही तालुक्यात प्रत्येक गावात इथूनच बस सोडली जाते. काही वर्षांपासून वणी आगारात नवीन बस येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बहुतांश बस भंगार अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच झरी सारख्या दुर्गम भागात जुन्या, भंगार झालेल्या बस सोडल्या जातात. अनेकदा बस बंद पडल्याने त्याचा चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
सरकारने काही दिवसांपूर्वीच बसभाडे वाढविले ज्यामुळे जनतेत प्रचंड संताप आहे. पैसे जर अधिकचे घेत असेल तर किमान सेवा तरी चांगली द्यावी अशी माफक अपेक्षा झरी तालुक्यातील रहिवाशी करीत आहेत. या गंभीर प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन झरी परिसरात चांगल्या बस सोडाव्यात अशी मागणी करीत आहे.