सुशील ओझा, झरी: पावसाअभावी कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे उत्पादन घटले आहे. मात्र झरी तालुक्याचे नाव दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नाही. परिणामी शेतक-यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे झरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात झरी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
झरी तालुक्यात पावसाअभावी कापूस, सोयाबीन इत्यादी पिकांची गंभीर परिस्थिती आहे. पुरेसे पाणी न मिळाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. शेतक-यांना एकरी ५ ते ६ क्विंटल कापसाचे उत्पादन निघणेसुद्धा कठीण झाले आहे. तर पावसाअभावी सोयाबिनच्या उत्पादनातही 50 टक्क्यांपेक्षा अधिकची घट झाली आहे. परिणामी आधीच हवालदिल झालेला शेतकरी आणखी अडचणीत आला आहे.
झरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. आदिवासी बांधव शेती करून तसेच शेतमजूर म्हणून काम करून आयुष्याचा गाडा हाकतात. मात्र यावर्षी दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका परिसरातील आदिवासी समुदायातील शेतकरी आणि शेतमजुरांना बसणार आहे.
सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जाबाजारीपणाला कंटाळून आदिवासी शेतकरी, शेतमजुरांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ होत आहे. आधीच वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यातच आलेल्या दुष्काळामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता खचला आहे. तरी झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी राकाँचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर मानकर, झरी तालुका प्रमुख संजय जंबे, संदीप धवणे, अमोल ठाकरे, विशाल पारशिवे, गजानन लाभशेट्टीवार, अंकुश नेहारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.