सुशील ओझा, झरी: गावातील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून समाजोपोगी विविध उपक्रम राबविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यावर पदाधिकाऱ्यांची निवडदेखील करण्यात आली. परंतु, बहुतांश समित्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला असून, केवळ शोभेसाठीच या पदाचा वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे. .
तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावातच सोडवता यावे आणि शांतता प्रस्थापित करता यावी, या हेतूने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची संकल्पना राबविण्यात आली. १५ ऑगस्ट २००७ पासून सदर मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करण्यासाठी ही योजना अस्तित्वात आली. ग्रामपंचायतींमध्ये ठराव करून या समित्यांची स्थापना करण्यात आली.
ग्रामसभेने निवडलेला प्रतिनिधी हा तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष असून समितीमध्ये सरपंच, उपसरपंच हे सदस्य म्हणून कार्यान्वित आहे. माजी सैनिक, वकील, पदविकाधारक, डॉक्टर, निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, महिला बचत गट, अध्यापक, शिक्षक या घटकातील प्रत्येकी एका प्रतिनिधीची सदस्य म्हणून समितीवर नियुक्ती केली जाते. या शिवाय ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्या प्रत्येकी एका सदस्यासह गावातील इतर प्रभावी अशा किमान तीन ते कमाल पाच व्यक्तींचीही सदस्य म्हणून नियुक्ती जाते..
या समित्यांमार्फत गावात संपूर्ण दारूबंदी करून अनिष्ट चालीरीती, परंपरा प्रतिबंध करणे त्याचबरोबर विविध उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबवणे, वनसंवर्धन व वनसरंक्षण करणे, ग्राम सुरक्षा दल स्थापन करून गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे आदी कामे केली जातात. शिवाय गावातील तंटे गावातच सामंजस्याने सोडविण्याबरोबरच समित्यांनी गणेशोत्सव, ईद आदी धार्मिक कार्यक्रम पोलीस सरंक्षणाविना साजरे करणे, आदी कामे पार पडली जातात.
या समित्यांना लाखो रुपयांचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र आज रोजी प्रत्येक गावात तंटामुक्त समित्यांचे काम केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीचा उद्देश सफल होण्याबाबत सांशकता निर्माण होत आहे. बऱ्याच दिवसांपासून तंटामुक्त समित्या कामे करीत नसल्याने पोलीस प्रशासनाला आजही अनेक गावात वाद-विवाद प्रसंगी दाखल व्हावे लागत आहे..