सुरू होती झेंडी मुंडी, पोलिसांनी उडवली घाबरगुंडी

पाच जुगारी अटकेत, एक तर निघाला जख्खड 80पार आजोबा

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक टॉकीज जवळ सुरू असलेल्या एका झंडी मुंडी जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार चालवणारे व जुगार खेळणारे असे एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. गुरुवारी दिनांक 10 एप्रिल रोजी सं. 6 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या धाडीत एक 83 वर्षांचे आजोबा देखील पोलिसांच्या हाती लागले. 

गुरुवारचा दिवस होता. सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कर्तव्यांवर होते. अचानक खबऱ्याकडून एक जबरदस्त खबर आली. सगळेच खाड्कन उभे झालेत. लागलीच एक मोठे नियोजन झाले. साध्याच वेशात एक पोलीस पथक आणि पंच मोहिमेवर निघाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

झंडी-मुंडी सुरू असल्याची ती खबर होती. झंडी-मुंडी म्हणजे नेमकं काय? हे बऱ्याच जणांना कदाचित माहितीही नसेल. मात्र हा एक प्रकारचा हारजीतचा जुगार असतो. हा जुगार दीपक चौपाटीवरील करणबारच्या समोर एका सार्वजनिक ठिकाणी सुरू होता. पोलीस स्टाफ आणि पंच त्या ठिकाणी पोहोचले. ते सगळे साध्या नागरी वेशात होते. त्यामुळे कुणालाच कशाचीच कुणकुण लागली नाही.

घटनास्थळी प्लास्टिकच्या एका पांढऱ्या रंगाच्या टेबलावर फ्लेक्स बोर्ड ठेवले होते. त्यावर चौकोन झेंडी मुंडी असे चित्र काढले होते. ते खेळण्यासाठी चार गोट्यादेखील होत्या. या गोट्या खेळून लोकांकडून पैसे घेऊन हारजीतचा खेळ सुरू होता. हा प्रकार पाहतच पंच आणि स्टाफने अत्यंत दक्षततेने रेड मारली. छापा टाकला. क्षणभर नेमकं काय होत आहे? हे आरोपींना कळलंच नाही. लगेच धांदल उडाली. पळापळ सुरू झाली. या धावपळीत पाच आरोपी मात्र हाती लागलेत. तर अन्य जुगारी फरार होण्यात यशस्वी झालेत.

रामपुरा वार्डातील शंकर गणपत धंदरे (58), रंगनाथनगर येथील परवेज सय्यद सय्यद तनवीर (22), गणेशपूर येथील अरूण गंगाधर पांपट्टीवार (59), तालुक्यातील ढाकरी येथील हुसेन वामन आत्राम (30), लालगुडा येथील कवडू गणपत कांबळे (83) या आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर इतर लोक धाड पडताच फरार झाले. घटनास्थळा वरून झंडी मुंडी फ्लेक्स बोर्ड व चार गोट्या असा एकुण 5000/- रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. फिर्यादी पो.कॉ. मोहम्मद वसिम मोहम्मद अकबर (38) यांच्या तक्रारीवरून वरील पाच आरोपींवर कलम 12 (अ) महा. जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गु्न्हे दाखल झालेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर याच्या आदेशानुसार पोउपनि गुल्हाने, पोउपनि रत्नपारखी. पो कॉ मोनेश्वर, पो कॉ नीलेश, पो कॉ गजानन, पो कॉ वसीम यांनी केली.पुढील तपास पोलीस स्टेशन वणीचे पोउपनि धीरज गुल्हाने करीत आहेत.

Comments are closed.