मुकुटबनजवळ भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर दहा जखमी

लग्नाची वरात घेऊन जाताना काळाचा घाला

0
सुशील ओझा, झरी: मुकुटबन जवळील साईबाबा जिनिंगजवळ आज गुरूवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास क्रुजर आणि ऍटोचा भीषण अपघात झाला. यात 3 लोकांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झालेत. जखमींमध्ये चौघांची परिस्थिती गंभीर आहे. लग्नाची वरात घेऊन जाताना हा अपघात झाला. या भीषण अपघातात 2 महिन्यांचं बाळ आश्चर्यकारकरित्या बचावलं आहे.
मुकुटबन येथील गजानन नरसीमलू कुंटावार यांचा साळा विकास ज्ञानेश्वर तुम्मावार रा. माणुसधरी ता. घाटंजी यांचे आज गुरूवारी दिनांक 30 मे रोजी मुकुटबन येथे लग्न होते. त्यानिमित्त माणुसधरी येथून पाहुणे लग्नाची वरात घेऊन मुकुटबन येथे आले होते. तर काही पाहुणे नांदेडवरून सकाळच्या नंदिग्राम एक्सप्रेसने धानोरा (लिंगटी) रेल्वेस्टेशन वर येणार होते. पाहुण्यांना आणण्यासाठी गजानन कुंटावार अकराच्या सुमारास क्रुजरने  (MH29-R 5981) चालकासह लिंगटी स्टेशनला पोहोचले. दुपारी साडे अकराच्या सुमारात पाहुण्यांना घेऊन ते क्रुजरने मुकुटबनला परतत होते.
सव्वा बाराच्या सुमारास मुकुटबनला पोहोचण्याच्या दीड किलोमीटर आधी साईबाबा जिनिंगजवळ क्रुजरच्या चालकाचे वाहनावरील संतुलन सुटले व क्रुजर चुकीच्या लेनला गेली. त्याच वेळी मुकुटबनहून विनोद बापूजी गोंडे हा ऑटोने (MH29 T-7857) सिट घेऊन लहान पांढरकवडा येथे जात होता. दरम्यान क्रुजरने ऑटोला समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ऑटो चकनाचूर होऊन रोडच्या खाली गड्यात जाऊन आदळला.

या अपघातात ऑटोमधील 3 जण जागीच ठार झाले. तर 8 जण जखमी झाले. यातील 4 जण गंभीर आहे. ऑटोमध्ये दोन वर्षांचं एक बाळ होतं. मात्र बाळाला कोणतीही ईजा झाली नाही. जखमींना आधी मुकुटबन येथील रुग्णलयात आणण्यात आले मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी वणीत हलवण्यात आले.
मृतांमध्ये ऑटोतील उज्वला दत्तू कुंटावार वय २५ वर्ष रा. मुकुटबन, बापूराव नारायण पानघाटे वय ६५ वर्ष रा. भेंडाळा व ओम दत्ता पिदूरकर वय १३ रा. कोडसी यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये सागर अमोल येलादे १४ वर्ष रा. भेंडाळा, गजानन नरसीमलू कुंटावार रा. मुकुटबन, कोंडूबाई महादेव कुमरे रा. पवनार, शिंदुबाई झबाजी विंचू ६५ रा. पांढरकवडा (ल), कमलाबाई नागोराव जुमनाके ६६ रा भेंडाळा, विनोद बापूजी गोंडे रा. पांढरकवडा (ल), महादेव मारोती कुमरे रा. पवनार व रोहिणी शाहू पिंपळकर रा पांढरकवडा (ल) हे जखमी झाले.

तर क्रुजरमधले गजानन कुंटावार रा. मुकुटबन, गजानन सोमेवार व पुटवार रा. गणेशपूर जि. नांदेड हे जखमी आहे. अपघात होताच क्रुजरचा चालक फरार झाला आहे. क्रुजर ही घाटंजी येथील अमोल डेहनकर यांची असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार धर्मराज सोनुने यांनी जमादार मारोती टोंगे, प्रवीण तडकोकुलवार,सुलभ उईके, नीरज पातूरकर व प्रदीप कवरासे यांना घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिसांनी जखमींना त्वरीत ऑटो मध्ये टाकून रुग्णालयात हलविले.
दोन महिन्यांचं बाळ वाचलं पण आई गेली…
या अपघातात मुकुटबन येथील रहिवाशी असलेली उज्वला दत्तू कुंटावार (२५) यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्याजवळ असलेलं त्यांचं दोन महिन्यांचं बाळ राजेश्वरी दत्तू कुंटावार बचावलं आहे. बाळा कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. मात्र बाळाच्या आईला जीव गमवावा लागल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी क्रुजरचा चालक व मालकावर ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ भादंवि अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्या फरार चालकाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.