जनतेची कामं आणि संविधानाचं रक्षण हेच प्रमुख कर्तव्य: खा. धानोरकर
मारेगावात खा. बाळू धानोरकर यांचा भव्य नागरी सत्कार
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मी जरी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असलो तरी आता लोकप्रतिनिधी आहे. सर्वांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. सध्या सत्ताधा-यांकडून लोकशाही धोक्यात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न होत आहे. मात्र आमची संख्या कमी असली तरी ही लोकशाही कशी टिकून राहिल यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेल अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी मारेगावकरांना दिली. दिनांक 3 जून रोजी सोमवारी संध्याकाळी खा. बाळू धानोरकर यांचा मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रात भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की इतके वर्ष भाजपकडे सत्ता असूनही खासदारांना परिसरातील विकास करता आला नाही. बेरोजगारीसारखा मोठा प्रश्न इथे असताना एकही मोठा उद्योग आणून स्थानिकांना रोजगार देण्यात माजी खासदार अपयशी ठरले आहेत. इतके वर्ष सत्ता भोगल्याने परिसरात अनेक छोटे मोठे प्रकल्प आणून बेरोजगारीचा प्रश्न सोडवता आला असता. परिसराचा विकास करता आला असता. मात्र ते माजी खासदाराला जमले नाही. त्यामुळे परिसरात जो विकासाचा बॅकलॉग आहे तो भरून काढणे हे माझे प्राथमिक काम असल्याचेही खा. बाळू धानोरकर म्हणाले.



