अनधिकृत तेंदुपत्ता संकलन: तेंदुपत्ता घेऊन कंत्राटदार पसार

वनविभागाच्या कारवाईनंतर ठेकेदाराचा पोबारा

0
सुशील ओझा, झरी: पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार कायद्याने आदिवासी ग्रामसभांनाच वनउपज व गौनखनिजाची मालकी दिली आहे. मात्र, त्या उपरही झरी तालुक्यातील भीमनाला व शिराटोकी पोडा अंतर्गत येणाऱ्या जंगल क्षेत्रात बेकायदा तेंदुपत्ता संकलन होत आहे. अनधिकृत संकलन करणाऱ्या ठेकेदाराने आज चक्क ५९ गोणी तेंदुपत्ता घेऊन पोबारा केल्याने त्या विरोधात तक्रारीवरून वनविभागाच्या पथकाने कारवाई केली.
झरी व मारेगाव तालुक्यात काही संस्था व ठेकेदाराकडून आदिवासी ग्रामसभांना न जुमानता तेंदुपत्त्याचे संकलन केले जात आहे. स्वयंघोषित वनहक्क समित्या गठित करून हा गैरप्रकार केल्या जातो आहे. त्यामुळे शिराटोकी ग्रामसभेच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्यपालांकडे तक्रारी केल्या आहे. त्या उपरही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभा अध्यक्षांनाच एकेरी शब्दात खुलासा मागण्याचा प्रताप केला. अशातच आज गैरविधायकपणे तेंदुपत्त्याचे संकलन करणाऱ्या ठेकेदाराने चांगलेच रंग दाखविले आहे. कुणालाही न जुमानता या ठेकेदाराने तेलंगणातील वरंगलच्या श्रीदेवी ॲण्ड कंपनी यांना अनधिकृत खरेदी केलेला ५९ गोणी तेंदुपत्ता अंदाजे किंमत ५ लाख रुपये यांना दिला. एका चारचाकी वाहनात भरून तो पसार झाल्याची तक्रार करण्यात आली.

सन २०१९ करिता पांढरकवडा येथील अब्दुल्ला जगमोहन गिलाणी हे परवानाधारक ठेकेदार असून, संकलन करण्याकरिता त्यांनी वनविभागाच्या ई-निविदा प्रक्रियेमध्ये रीतसर निविदा सादर केली. वनविभागाच्या मान्यतेने भीमनाळा, शिराटोकी गावाचे तेंदुपुडा खरेदीचे काम घेतले. परंतु वसंत फुलू कुमरे यांनी शिराटोकी व भीमनाळा गावात बेकायदेशीररीत्या तेंदुपत्ता गोळा करीत असल्याची माहितीवजा तक्रार २५ मे रोजी वरिष्ठांकडे केली. दरम्यान २९ मे रोजी वसंत कुमरे याने तेलांगणातील श्रीदेवी ॲण्ड कंपनीला बेकायदेशीर ४८ हजार ६०० रुपयांचा वनोपजा परवाना बनविला. त्यानंतर एम एच ३३- ४३५५ क्रमांकाच्या वाहनात तंेदुपत्ता भरून चालक कयूम रशीद कुरेशी सोबत शिबला मार्ग पसार झाला.
या बाबतची भणक लागताच वनपरिक्षेत्र अधिकारी मेहेरे,वनपाल लांबतुरे,वनरक्षक पुलेनवार,कानिंदे व इतर कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून वाहन थांबविले. वनाधिकाऱ्यांनी चौकशी करणे सुरू केले असता ठेकेदार कुमरे व चालक कयूम कुरेशी यांनी कोणतीही माहिती न देता पळ काढला. श्रीदेवी ॲण्ड कंपनी ही तेलांगणातील असून, सदर वाहन मारेगाव तालुक्यातील खेकडवाई येथे नेल्याची माहिती आहे. या प्रकरणी श्रीदेवी ॲण्ड कंपनी, वसंत कुमरे चालक कयूम कुरेशी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अब्दुल्ला गिलाणी यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे..
Leave A Reply

Your email address will not be published.