शिक्षिकेच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी फरार आरोपी अटकेत

प्राणघातक हल्ल्यात शिक्षिका झाली होती जखमी, पतीची पत्नीच्या हत्येसाठी 2 लाखांची सुपारी.... 'या' कारणासाठी दिली होती सुपारी...

जितेंद्र कोठारी, वणी: स्वत:च्या पत्नीच्या हत्येची गुंडांना सुपारी देऊन प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी फरार असलेल्या चौथ्या आरोपीला चंद्रपूर येथून अटक करण्यात आली आहे. दीपक सेंगापार असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या सहा दिवसांपासून फरार होता. या प्रकरणी सुपारीबाज पती व त्याच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. या आरोपींना 5 सप्टेंबर पर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्नीची दोन लाख रुपयांची गुंडांना सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की वैशाली दादाजी चल्लावार (40) या चंद्रपूर येथील सिविल लाईन भागातील रहिवाशी असून त्या वणी तालुक्यातील नायगाव (बु) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांचे सन 2010 मध्ये पत्रकार असलेल्या जितेंद्र रामचंद्र मशारकर याच्याशी लग्न झाले होते. त्या रोज शाळेसाठी चंद्रपूर ते नायगाव असे बसने अपडाऊन करतात. गुरुवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी त्या नेहमी प्रमाणे शाळेत गेल्या होत्या. संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर त्या बससाठी बेलोरा फाट्यावर आल्या होत्या.

5.30 वाजताच्या सुमारास स्टॉपवर वैशाली यांना चंद्रपूर येथे दुचाकीने जाणारा एक परिचित भेटला. त्या परिचिताला त्यांनी लिफ्ट मागत चंद्रपूर येथे सोडण्याची विनंती केली. दरम्यान दुचाकीवर बसताना एका काळा टीशर्ट आणि निळी जिन्स पॅन्ट घातलेला एक तरुण वैशाली यांच्या जवळ आला व त्याने चाकूने वैशाली यांच्या गळ्यावर हल्ला केला. मात्र हल्ला चुकवल्याने त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान या घटनेमुळे झालेला आरडाओरड ऐकून परिसरातील लोक व उपस्थित शिक्षकांनी हल्लेखोराकडे धाव घेतली. दरम्यान गावक-यांनी हल्लेखोराचा पाठलाग करत हल्लेखोराला ताब्यात घेतले.

पोलिसांनी हल्लेखोराची चौकशी केली असता त्याचे नाव मोहम्मद राजा अब्बास अंसारी (20) असून मुळचा बिहारी पण हल्ली मुक्काम चंद्रपूर असल्याची माहिती मिळाली. पोलिसी खाक्या दाखवताच पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. शिक्षिकेचा पती असलेला जितेंद्र मशारकर (45) रा. चंद्रपूर यानेच त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची सुपारी दिल्याचे समोर आले. पोलिसांनी सुपारीबाज पत्रकार जितेंद्र मशारकरला व संजय राजेश पट्टीवार (30) रा. चंद्रपूर याला अटक केली.

पत्नीच्या हत्येची दोन लाखांची सुपारी
13 वर्षांआधी जिल्हा परिषदेत शिक्षिका असलेल्या वैशाली यांचे जितेंद्र माशरकर या व्यवसायाने पत्रकार असलेल्या व्यक्तीशी लग्न झाले. त्यांना दोन अपत्यही आहे. वैशाली यांना पगारातून चांगली कमाई व्हायची. त्यातून त्यांनी काही मालमत्ताही विकत घेतली होती. या मालमत्तेवर पतीचा डोळा होता. त्यामुळे जितेंद्रने पत्नीला संपवण्याचा प्लान आखला.

त्यासाठी पती जितेंद्रने संजय पट्टीवार, महंमद राजा अब्बास अंन्सारी व दीपक सेंगापार या तिघांची मदत घेत त्यांना 2 लाखांची पत्नीच्या हत्येची सुपारी दिली. त्यासाठी अर्धे पैसे टोकन मनी म्हणून तर अर्धे पैसे काम झाल्यावर द्यायचे ठरले. पतीने 1 लाख रुपये हल्लेखोरांना आधीच दिले होते. मात्र याआधी तिनदा हल्लेखोरांचा प्रयत्न सफल झाला नाही.

अनेक वेळा संपवण्याचा प्रयत्न
हल्ला झालेल्या शिक्षिका आधी त्यांच्या दुचाकीने चंद्रपूरहून नायगाव येथे शाळेत ये-जा करायच्या. मात्र त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा दोनदा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांनी बसने प्रवास सुरू केला. मात्र संधी साधून हल्लेखोरांनी 18 ऑगस्ट रोजी संधी साधत शिक्षिकेवर हल्ला केला. मात्र सुदैवाने हल्ला चुकल्याने त्यांचा जीव ही वाचला व गावक-यांच्या प्रसंगवधाने हल्लेखोरही ताब्यात आला.

या घटनेतील चौथा आरोपी दीपक सेंगापार फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथक पाठवले होते. अखेर आज मंगळवारी चौथ्या आरोपीलाही शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर येथून अटक केली. या प्रकरणी चार ही आरोपींविरोधात भादंविच्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व सपोनि गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामेश्वर कांडुरे करीत आहे.

हे देखील वाचा:

महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना

वणीत लोढा हॉस्पिटलमध्ये रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे थाटात उदघाटन

वणीत निघाला विद्यार्थी व पालकांचा भव्य मोर्चा

Comments are closed.