मध्यरात्री सुरू होती कारद्वारा देशी दारूची तस्करी

4 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त, महिलेसह तिघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: मध्यरात्री देशी दारुची अवैधरित्या पुरवठा करणा-या महिलेसह दोन तरुणांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ही कार्यवाही पोलिसांनी 112 नंबरवर आलेल्या कॉलवरून केली. मोहर्ली गावात जाऊन पोलिसांनी आरोपींकडून मारुती स्विफ्ट डिझायर कार व देशी दारुचे 584 क्वार्टर जप्त केले. सौरभ किशोर नगराळे (20) व ऋतिक रवी पत्तीवार (19) दोघं ही राहणार राजूर (कॉलरी) व संगीता कैलाश मडावी रा. मोहुर्ली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

सोमवारच्या मध्यरात्री पोलीस विभागाच्या डायल 112 नंबरवर एका व्यक्तीने कॉल करून मोहूर्ली गावातून अवैधरित्या देशी दारूचा पुरवठा होत असल्याबाबतची माहिती दिली. माहितीवरून पोलीस पेट्रोलिंग पथकाने तात्काळ मोहूर्ली गाव गाठले. कॉल करणा-या व्यक्तीला विचारपूस केली असता त्यांनी तलाठी कार्यालयजवळ उभी असलेली पांढऱ्या रंगाची कारमधून एक इसम चुंगडीमध्ये देशी दारूच्या 200 शिश्या संगीता कैलास मडावी हिच्या घरी घेऊन गेल्याचे सांगितले.

पोलीस पथकातील पीएसआय शिवाजी टिपूर्णे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष स्विफ्ट डिझायनर कार क्रमांक (MH29 AD 5359) या कारची झडती घेतली असता त्यात 180 एम एल दारूची 384 शिश्या मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी संगीता मडावी हिच्या घरी जाऊन झडती घेतली असता घरात 90 एमएल देशी दारूचे 200 पव्वे सापडले.

पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कार किंमत 4 लाख व जप्त दारु किंमत 29 हजार 648 असा एकूण 4 लाख 29 हजार 648 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल वसीम मोहम्मद अकरम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना

वणीत लोढा हॉस्पिटलमध्ये रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे थाटात उदघाटन

वणीत निघाला विद्यार्थी व पालकांचा भव्य मोर्चा

Comments are closed.