‘निर्गुडे’च्या पूर प्रतिबंधित क्षेत्रात उभ्या झाल्या टोलेजंग इमारती

बिल्डर्स आणि अधिकाऱ्यांचे संबंध उठले नागरिकांच्या जीवावर 

जितेंद्र कोठारी, वणी: भविष्याचे आमिष दाखवून जनतेला फसवण्याचा आणि लुटण्याचा धंदा वणीत सध्या जोरात सुरू आहे. जी जमीन पावसाळ्यात नदी-नाल्यांच्या पुरात बुडते, त्याच जमिनीची खरेदी-विक्री करून प्लॉट बनवले जात आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ करणारे बिल्डर्स आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बळावर हे जोखिमेचे कृत्य राजरोसपणे सुरू आहे. यात बिल्डर्स आणि दलालांसह महसूल, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, नगर रचना, नगर परिषद, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची सर्रासपणे चांदी होत आहे.

नदीचे पात्र हे नदीचे हक्काचे घर आहे. त्या घरामध्ये इतरांनी अतिक्रमण करू नये ही नदीची अपेक्षा असते. पण घडते वेगळेच. नदी पात्रात पुराचे पाणी कमी प्रमाणात आल्यामुळे पात्राचा बराचसा भाग वर्षानुवर्षे उघडा राहतो. या उघड्या जागेवर अतिक्रमण करण्याची लालसा नदीच्या कडेला राहणाऱ्या लोकांत निर्माण होते. याचे विकृत स्वरूप वणी शहरात दिसून येते. शहराची जीवनदायिनी असलेली निर्गुडा नदीच्या तिरावर अनेक लोकांनी घर बांधले. तर काही बांधकाम व्यावसायिकांनी चक्क नदी पात्राजवळील सखल भागात भर टाकून टोलेजंग इमारती उभ्या केल्या.

गेल्या 25 वर्षांमध्ये वणी शहराचे झपाट्याने विस्तार झाला आहे. शहराची सीमा ओलांडून निर्गुडाच्या पलीकडील शेतीपयोगी जमिनी अकृषक करुन तिथं मोठ्या प्रमाणावर निवासी ले आऊट तयार झाले. या भागात निर्गुडाच्या खोऱ्यात अनेक बिल्डरांनी सरतीच्या जमिनी विकत घेतल्या आणि त्या शेतजमिनी बिनशेती करून तिथे ले-आऊटचा धंदा सुरू केला. या ले-आऊटचे भूखंड लोकांना जाहिरातींच्या माध्यमातून विकण्याचा धंदा सुरू झाला.

वणी मुकुटबन मार्गावरील निर्गुडा नदीच्या काठावर राहणाऱ्या बाहेरगावी नागरिकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. या ले-आऊटमध्ये ज्या लोकांनी प्लॉट खरेदी केले आहेत, ती लोकवस्ती नदीच्या काठावर म्हणजेच मृत्यूच्या तोंडावर आहे. प्लॉट खरेदी करताना ग्राहकांना बऱ्यापैकी सोयीसुविधेचे स्वप्न दाखविण्यात आले. पूर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बांधकाम मनाही असताना या भागात बहुमजली सदनिका व स्वतंत्र बेंगलो उभे करुन विकण्यात आले.

जलसिंचन विभागाच्या नियमानुसार नदीच्या पूर क्षेत्रातून निळी रेषा ते लाल रेषे दरम्यानचे क्षेत्र नियंत्रित विकास क्षेत्र म्हणून संबोधले जाते आणि या क्षेत्रात तळमजल्यात बांधकाम असू नये, ती जागा पार्किंगसाठी वापरावी, त्यात लाईट मीटर असणार नाहीत इत्यादीची खबरदारी घ्यावी, अशा काही अटींच्या आधिन राहून बांधकामास परवानग्या देण्यात येतात. मात्र वणी नगर परिषद हद्दीत व लगतच्या ग्राम पंचायत क्षेत्रात या सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम परवानग्या देण्यात आली.

ले आऊटच्या सांडपाण्यामुळे निर्गुडा प्रदूषित
निर्गुडा नदीतून अख्या वणी शहरात पाणी पुरवठा करण्यात येते. त्यामुळे या नदीला वणीची जीवनदायिनी म्हटले जातात. मात्र निर्गुडाच्या काठावर असलेल्या काही वसाहतीमधील घरांचे सांडपाणी निर्गुडा नदीमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे नदीच्या पाण्यात प्रदूषण वाढले आहे. याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.