मुख्याध्यापकच चक्क दहा दिवस गैरहजर, भुरकी शाळेतील प्रकार

वणी बहुगुणीचा दणका, जि. प. सदस्याची शाळेला भेट

0

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भुरकी येथील द्विशिक्षकी शाळेत कार्यरत असलेल्या दोनही शिक्षकांनी चक्क शाळेला दांडी मारून विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. या प्रकार वणी बहुगुणी न्यूज पोर्टलने उघडकीस आणताच, शनिवारी जिल्हा परिषद सदस्य सकाळीच शाळेत दाखल झाले. त्यांनी उपस्थिती रजिस्टर तपासले असता या शाळेतील मुख्याध्यापक चक्क दहा दिवस गैरहजर दिसले. या गंभीर प्रकाराची पंचायत समितीने दखल घेतली असून मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भुरकी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानी चक्क शाळेला दांडी मारून विद्यार्थ्यांना ताटकळत वाट बघत ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. शाळेतील विद्यार्थी शाळेबाहेर उभे असल्याचे सरपंच अनिल सोनटक्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील शेडामे तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप बदकी, दादाजी किनाके,नामदेव बदकी, नानाजी लांबट,किसन सोनटक्के, विजय निमसडे यांना माहीत मिळताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. त्यांना लक्षात आलं की शाळेतील दोनही शिक्षक बेपत्ता होते. या प्रकाराची दखल वणी बहुगुणी न्यूज ने घेत याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले.

वृत्त प्रकाशित होताच शनिवारी दोनही शिक्षक शाळेत उपस्थित झाले.  सोबतच या जिल्हा परिषद गटाचे सदस्य बंडू चांदेकर यांनी शाळेला सकाळीच भेट देऊन पाहणी केली.  मात्र वणी पंचायत समिती शिक्षण विभागाचे एकही अधिकारी शाळेत पोहचले नाही. पालक वर्ग संतापला होता. शिक्षकांच्या हलगर्जीपणाला कंटाळून गेले होते.  शिक्षक अनियमित येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.  वारंवार तोंडी तक्रारी करण्यात आल्या मात्र याकडे प्रशासनाने जणू काही दुर्लक्ष केले असल्याचे आरोप पालकांनी केले होते.

शेवटी शिक्षकांच्या या प्रकाराला कंटाळून पालकांनी चक्क शाळेला कुलूप ठोकण्याचा विचार ही केला. परंतु प्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्याचे त्यांनी ठरवीत भुरकी शाळेतील दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई न झाल्यास येत्या सोमवारी शाळेत एकही मुलगा जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली.  मात्र यावर गटविकास अधिकारी यांनी मध्यस्थी करीत केंद्रप्रमुखाना तात्काळ अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन भुरकी येथील पालकांना दिले.

शाळा सुटल्यानंतर भुरकी येथील सरपंच, शाळा समिती अध्यक्ष व जवळपास१५ पालकांनी पंचायत समितीमध्ये धडक देत मुख्याध्यापकाचा जणू पाढाच वाचला,  यात गेल्या ५सप्टेंबर पासून तर १५ सप्टेंबर पर्यँत मुख्याध्यापक गैरहजर असल्याचे उपस्थिती रजिस्टर वरून दिसून आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून घडविण्याचे काम करणारे कामचुकार शिक्षक असे वागले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकणार कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बहुतांश शाळेतील शिक्षक लपूनछपून शाळेला दांडी मारत असल्याचे दिसत आहे. त्यातही ऑनलाइनचे कामे असल्याचे बहाणे करून स्थानीक अधिकाऱ्यांशी हितसंबंध जोपासून डाव साधणारे भक्कम शिक्षक या शिक्षकी पेशाला काळिमा फासत आहे.

मुख्याध्यापकावर पंचायत समिती काय कारवाई करणार?

भुरकी येथील मुख्याध्यापक गेल्या दहा दिवसापासून शाळेत गैरहजर आहे. सोबतच शुक्रवारी तर चक्क दोनही शिक्षकांनी शाळेला दांडी मारून जणू कळसच गाठला आहे.  पालकांनी आक्रमक भूमिका घेत गटविकास अधिकारी यांचेशी चर्चा केली गटविकास अधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.  आता या कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.