शेतकऱ्याला सुमारे दोन लाख रुपयांचा गंडा

मोबाईल टॉवर लावण्याची बतावणी करून फसवणूक

0 466

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील मानकी येथील शेतकऱ्याला काही भामट्यांनी मोबाईल टॉवर लावून देण्याची बतावणी करून 1 लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. शेतामध्ये मोबाईल टॉवर लावतो असे सांगून काही भामट्यांनी मासिक भाडे आणि नोकरीचे आमिश दाखविले. त्याकरिता शेतकऱ्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे घेण्यात आले. ही फसवणूक गेल्या वर्षांपासून सुरू होती. यात शेतकऱ्याला कोणतीही नोकरी व मोबदला मिळाला नाही. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, मानकी येथील शेतकरी नत्थू राजेश्वर मोते (50) यांची गावालगत 4 एकर शेती आहे. ते शेती करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. एके दिवशी त्यांना शेतात काम करीत असताना फोन आला. फोन करणा-याने स्वतःचे नाव रजनिकांत सिंग असल्याचे सांगून आपण मोबाईल कंपनी कडून बोलत आहे. आमच्या सर्वेनुसार आपल्या शेताची मोबाईल टॉवर लावण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्याला आम्ही 21 लाख रुपये देऊ. तसेच मासिक 20 हजार रुपये टॉवरचे भाडे आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देऊ अशी बतावणी त्याने केली. सोबतच आपणास पोस्टाद्वारे एक पत्र प्राप्त होणार ज्यामध्ये आपली संपूर्ण माहिती दयावी असे सांगितले.

दोन तीन दिवसांनी त्यांना पोस्टद्वारे टपाल प्राप्त झाली. ज्यामध्ये 21 लाख व 20 हजार रुपयांचा तामिळनाडू मर्चनटाईन बँक शाखा गुडगावचा धनादेश तसेच अप्लिकेशन फॉर्म होते. त्यावर व्होडाफोन कंपनीचा शिक्का होता. सोबतच कुटुंबतील एक व्यक्तीला नोकरी देण्याचा उल्लेख देखील त्यात होता. त्यानंतर त्यांना पुन्हा 6 एप्रिल 2017 ला याच व्यक्तीकडून फोन आला की, तुम्हाला रजिस्ट्रेशन फी म्हणून 4500 रुपये बँकेत जमा करावे लागेल. त्यानुसार नत्थु यांनी पैसे जमा केले. त्यानंतर नोकरी आणि 21 लाखांचे आमिश दाखवून
त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. ही रक्कम वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात जमा केली गेली. ही रक्कम जेव्हा 1 लाख 92 हजार रुपयांच्या घरात गेली त्यावेळी नत्थु यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.

एवढी लूट केल्यानंतरही आरोपीचा फोन आला तसेच त्याने जीएसटी लागल्यामुळे आणखी 30 हजार जमा करण्याची मागणी केली. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वणी पोलिसात आरोपी रजनीकांत सिंग याच्या विरोधात फसवणुकी ची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 420,468, 471 नुसार गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पडघन करीत आहे.

यागोदरही लाखो रुपयांची लॉटरी लागल्याचे किंवा मोठे बक्षीस मिळाल्याचे आमिश दाखवून अनेकांची लूट करण्यात आली आहे. यात वणी आणि परिसरातील अनेकांचा समावेश आहे. सोबत एटीएममधून पैसे काढण्याचे धाडस काही भामट्यांनी केले आहे. एटीएम बंद करण्यात येत आहे किंवा एटीएम वेरीफिकेशन करत असल्याचे सांगून अनेकांना फसवण्यात आले आहे. आता चोरट्यानी नवीन शक्कल लढविण्यास सुरवात केली आहे. ज्यामध्ये ते मोबाईल टॉवर लावण्याचे आमिश दाखवीत आहेत. तरी आशा प्रकारचा फोन आल्यास सतर्कता बाळगावी असे आवाहन वणी बहुगुणी तर्फे करण्यात येत आहे.

NBSA
Comments
Loading...