शिवसेना शहरप्रमुखपदी सुधीर थेरे यांची नियुक्ती

शिवसैनिकांचे खच्चीकरण सुरू असल्याचा राजू तुराणकर यांचा आरोप

निकेश जिलठे, वणी: शिंदे गटाने शिवसेनेत पाडलेली उभी फुट व आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख पदी सुधीर थेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी तालुका अध्यक्ष गणपत लेडांगे यांना तालुका संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांचे खच्चीकरण करणे सुरू असल्याचा आरोप केला आहे.

Podar School 2025

सुधीर थेरे हे युवा काळापासूनच शिवसेनेशी जुळलेले आहे. त्यांच्या पत्नी अर्चना थेरे या वणी नगरपालिकेच्या अध्यक्ष देखील राहिलेल्या आहेत. सुधीर थेरे यांना पहिल्यांदाच पक्षाने जबाबदारी दिली आहे. आगामी नगराध्यक्ष हा थेट जनतेमधून निवडला जाणार असल्याने त्याची पूर्वतयारी म्हणून ही नियुक्त करण्यात आल्याची चर्चा शहरातील स्थानिक राजकीय वर्तुळात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय – सुधीर थेरे
आजपर्यंत मी कोणतेही पद घेतले नव्हते. पक्षाने विश्वास टाकत जी जबाबदारी दिली ती योग्य प्रकारे पार पाडणार. शहरात पक्ष वाढवण्याचा व आगामी नगरपालिका निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय राहणार आहे.
– सुधीर थेरे, शहर अध्यक्ष शिवसेना, वणी

ऐन निवडणुकीच्या आधी पक्षाने पद काढल्यामुळे माजी शहर अध्यक्ष राजू तुराणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 5 वर्षांपासून शहरात पक्ष वाढीसाठी काम केले आहे. अनेक आंदोलन केले. तसेच पक्षवाढीसाठी विविध अभियानही राबवले. मात्र जुन्या व पक्षनिष्ठ शिवसैनिकांला डावलून खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप राजू तुराणकर यांनी केला आहे.

बैठकीबाबत संपर्क न केल्याचा आरोप
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर संपर्क प्रमुखांनी महाराष्ट्रभर शिवसैनिकांच्या बैठक घेतल्या. वणीतही ही बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीबाबात आम्हाला कोणतीही कल्पना दिली नसल्याचा आरोप तुराणकर यांनी केला आहे. तसेच मुंबई येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीबाबतही कोणताही निरोप किंवा कल्पना न दिली नाही. पक्षाच्या बैठकीला डावलणे हे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राजू तुराणकर यांनी केला आहे.

येत्या काही दिवसांमध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे. यावेळी थेट नगराध्यक्षांची निवड होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची देखील स्थानिक राजकारणात चर्चा आहे. दरम्यान नाराजीवर सुधीर थेरे यांनी एक शहर प्रमुख म्हणून सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन चालणार असल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’ला दिली.

शिंदे गटाचा वणीत प्रभाव नाही
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी त्याचा प्रभाव दिसून आला आहे. मात्र वणी विधानसभा मतदारसंघात याचा कोणताही प्रभाव दिसून आलेला नाही. बंडखोरी दरम्यान शहरात शिवसेनेतर्फे शिंदे गटाचा जोरदार निदर्शने करून निषेध करण्यात आला होता. जिल्ह्यात काही ठिकाणी शिंदे गटाला समर्थन असणा-यांना पदमुक्त करून नवीन नियुक्ती करण्यात आली असली तरी वणीत मात्र पदवाटपात असा कोणताही प्रकार नसल्याचे दिसून येत आहे.

Comments are closed.