कर्जमाफीसाठी नवीन टुमणं, भरावा लागणार 15 पानांचा ऑनलाइन फॉर्म
ऑनलाइन फॉर्म सक्तीमुळे शेतक-यांची अडवणूक
मुंबई: राज्यातील शेतक-यांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, या कर्जमाफीचा लाभ अद्यापही शेतक-यांना मिळालेला नाहीये. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना एक प्रकारे परीक्षाच द्यावी लागणार असल्याचं पहायला मिळत आहे. कारण, कर्जमाफीसाठी शेतक-यांना तब्बल 15 पानांचा फॉर्म भरावा लागणार आहे.
कर्जमाफीसाठी करावा लागणारा अर्ज तब्बल 15 पानांचा आहे. हा अर्ज भरूनच कर्जमाफीची पुढील प्रक्रिया होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरावा लागणार आहे. राज्य शासनाने शनिवारी कर्जमाफी, प्रोत्साहनपर इतर लाभ मिळवण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना प्रसिद्ध केला आहे. हे अर्ज भरताना आधारकार्ड अत्यावश्यक आहे. तसेच अर्जदाराला वैयक्तीक माहितीसह बँक खाती, त्याचा खाते क्रमांक,कर्जाचा प्रकार व कर्जाची रक्कम ही माहिती सादर करावी लागणार आहे.
फॉर्म भरताना शेतकऱ्यांना OTP क्रमांक जनरेट करावा लागणार आहे. शेतकरी शेतात जाणार की तालुक्याच्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरतील. साधा कॉलेज अॅडमिशनचा अर्ज ऑनलाइन भरताना विद्यार्थ्यांना इतक्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे तर मग शेतक-यांना हे कसे जमेल?, असा प्रश्न काँग्रेस आमदार सतेज पाटील उपस्थित केला आहे.
हा फॉर्म सोपा असल्याचा दावा सरकार करत असेल, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊंनी हा फॉर्म भरून दाखवावा, मी त्यांचा सत्कार करेन, असं आव्हानही सतेज पाटील यांनी दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवन येथून करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. या प्रक्रियेमुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पोहोचण्यास मदत होईल.
(घाटकोपर इमारत अपघात प्रकरण: 17 जणांचा मृत्यू, अाणखी लोक ढिगा-याखाली)
राज्यातील २५ हजार आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज स्वीकारण्याची सुरुवात झाली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही २५ हजार रुपये प्रोत्साहनपर मदत देण्यात येणार आहे. अशाप्रकारे मदत देणारे हे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे.