ऑर्डर.. ऑर्डर..! दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा

राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचे आदेश.... मराठी पाट्याबाबत मनसेच्या लढ्याला यश मिळाल्याने वणीत फटाके फोडून जल्लोष साजरा

 

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यातील सर्व आस्थापना, दुकाने तसेच कार्यक्षेत्रात येत्या दोन महिन्यात मराठी भाषेमध्ये पाट्या (Signboard) लावा. असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील व्यापाऱ्यांना दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी गेली कित्येक वर्षं जो संघर्ष केला, त्याला यश मिळाल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर वणी येथे मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. 

गेल्यावर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकानात इतर भाषेसोबत मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. आदेशाविरुद्ध फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोशिएसनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने सदर याचिका फेटाळली. त्यानंतर असोशिएसनने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन महिन्यात मुंबईसह राज्यातील सर्व आस्थापनावर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश दिले. तसेच कोर्टाने व्यापाऱ्यांना सल्ला दिला कि, वकिलांवर खर्च करण्यापेक्षा दुकानदारांनी मराठीमध्ये पाट्या कराव्यात. मराठीत काय लिहिले आहे ते अनेकांना सहज वाचता येते, तेव्हा दुकानदारांनी मराठीतही नावे लिहिण्याच्या नियमाला विरोध करू नये. असेही कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मनसेच्या ‘मराठी पाट्या’ मुद्द्याला अखेर यश

मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे. मराठीचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत असायला पाहिजे, यासाठी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे मागील 17 वर्षापासून लढा देत होते. मराठी पाटी आंदोलनामुळे माझ्यासह अनेक महाराष्ट्र सैनिकांना जेल मध्ये सुद्धा जावे लागले होते. कोर्टाने अखेर हा मुद्दा निकालात काढल. सर्व व्यापाऱ्यांना दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करतो. मराठी भाषेत पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध शासन कारवाई करेल ते करेल, परंतु या बाबीकडे मनसैनिकांचेही लक्ष राहणार आहे.

राजू उंबरकर – नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Comments are closed.