विविध मागण्यांसाठी श्री गुरुदेव सेनेचे धरणे
बहुगुणी डेस्क, वणी: येथील तहसील कार्यालयाचे समोर गुरुवारी श्री गुरुदेव सेनेच्या वतीने सुरक्षा जवान व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. स्वतंत्र भारतात सुरक्षा जवान व अन्नदाता शेतकरीच दुःखी असेल तर या देशाच मोठं दुर्भाग्य आहे सरकारने मात्र जाणीवपूर्वक यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले असून अगदी तोंडवर आलेल्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याअगोदर यांच्या प्रश्नाची सोडवणूक करावी अन्यथा सरकारला याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला मंडळाच्या भजनाने आंदोलनाला सुरवात करण्यात आली होती . यावेळी शेतकरी व सुरक्षा जवानांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांना दिले. या निवेदनात मारेगाव पोलीस स्टेशनचे जमादार राजू कुडमेथे यांना शहीद घोषीत करण्यात यावे, कर्त्यव्यावर शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी.
चंद्रपूर येथील शहीद पीएसआय छत्रपती चिडे यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा व त्यांच्या घटनेची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी, शिपाई ते ए एस आई पर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्लॅस्टिक बुलेटची रिव्हॉल्वर २५ मॅगनिजसह देण्यात यावी, तेलंगणा राज्यातील निवडणूक दरम्यान गृहरक्षणाचे १०४० रुपये वसूल केले, परंतु प्रत्यक्ष मात्र ४०० रुपयेच दिले असून उर्वरित सर्व रक्कम देण्यात यावी.
वणी शहर व शहराबाहेरील अवैध धान्य खरेदी केंद्र बंद करण्यात यावेत, संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करावा, यावर्षी कापूस उत्पन्नात मोठी घट आली असून कापूस दुष्काळ घोषीत करून शेतकऱयांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत घोषित करावी, तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करून त्यांना २४ मोफत वीज पुरवठा करण्यात यावा या मागण्या करण्यात आल्या आहे. यावेळी मिलिंद पाटील, होमदेव कनाके,दशरथ राजूरकर पुंडलिक मोहितकर, नत्थू जुनगरी, मारोती खापणे, सुजाता कांबळे, विजया जिडेवार, शीला जयसिंगपुरे, सविता अक्कलवार, यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते असून मुर्धोनी येथील महिला मंडळाने विशेष सहकार्य केले.