आता एनसीसी आणि स्काऊट, गाईडच्या विद्यार्थ्यांनाही मिळतील अतिरिक्त गुण

0

विलास ताजने, वणी: महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण समितीच्या शिफारशीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली होती. तथापि काही त्रुटींमुळे बऱ्याच खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलतीचा लाभ मिळत नव्हता. तसेच एनसीसी आणि स्काऊट गाईडचे विद्यार्थी या गुणांपासून वंचित राहत होते.

म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, खेळ संघटना, खेळाडू आणि पालकांनी क्रीडा धोरणातील त्रुटी दूर करण्यासोबतच एनसीसी आणि स्कॉऊटच्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा सवलतीच्या धर्तीवर अतिरिक्त गुण देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्याअनुषंगाने खेळाडू विद्यार्थ्यांसह एनसीसी आणि स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनाही आता सवलतीचे वाढीव गुण मिळणार आहे.

सदर सवलतीचा लाभ दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य संपादन केलेल्या आणि सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

तसेच प्रजासत्ताक दिन संचलन, राष्ट्रीयस्तर शिबिर, संलग्न स्पर्धा सहभाग(१०गुण), विजेते (१५गुण),आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज प्रोग्रॅम मधील सहभागी एनसीसी छात्र (२० गुण)आणि राष्ट्रपती पदक विजेता स्काऊट व गाईड विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबिर सहभागी विद्यार्थी (१० गुण) सवलतीच्या गुणांसाठी पात्र ठरणार आहे. सदर सवलत शैक्षणिक सत्र २०१९ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांपासून लागू राहणार आहे.

खेळाडू हा एकापेक्षा अधिक खेळात, एनसीसी, स्काऊट, गाईडची शिबीरे यात सहभागी झाला असेल तर त्याला उच्चत्तम असणाऱ्या एकाच सवलतीचे गुण देय राहतील. संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्यांनी खेळाडूचे प्रस्ताव त्या – त्या शैक्षणिक वर्षात दि. १ जानेवारी ते ५ एप्रिल पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहे.

तसेच एनसीसी, स्काऊट गाईड यांनी शैक्षणिक वर्षातील शिबिरे, संचलन यामध्ये सहभागी, राष्ट्रपती पदक विजेत्या विध्यार्थांची माहिती चालू शैक्षणिक वर्षात १ मार्च पर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे सादर करावयाची आहे. सदर शासन निर्णयामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोलाचा फायदा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.