ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे एका ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यात महिलेच्या पायावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले. आंबेडकर चौकात दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.
अफरोज खान हे करणवाडी येथील रहिवासी आहे. त्यांचे मुलं मारेगाव येथील शाळेत शिकतात. शाळा संपल्यानंतर अफरोज हे त्यांच्या पत्नी सीमा खान यांच्यासोबत मुलांना घेऊन दुचाकीने मारेगाव वरून गावी जात होते. त्याच वेळी बालू चव्हाण हा सिमेंट भरलेला ट्रक (RJ-11-G A9823) घेऊन यवतमाळच्या दिशेने जात होता. ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. यात महिला खाली पडली आणि तिच्या मांडीवरून ट्रकचे सर्व चाक गेले. त्यामुळे महिलेच्या पायाचा चेंदामेंदा झाला. तर इतरांना इजा झालेली नाही.
घटना घडताच ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. मात्र उमर शरीफ व सुनील घंटलवार या तरुणांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. ट्रक चालकाला करणवाडीजवळ या तरुणांनी पकडले. हा अपघात बघून नागरिक संतप्त झाले. त्यांनी मार्डी चौक परिसरात ब्रेकरच्या मागणीसाठी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. अखेर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत नवीन वर्षांत स्पीड ब्रेकर बसवण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.