सावित्रीबाई फुलेंमुळेच शिक्षण व्यवस्थेला दिशा मिळाली: मोहरमपुरी
राजूर येथे सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
बहुगुणी डेस्क, वणी: ज्या धर्मामध्ये स्त्रियांना व शूद्रांना शिक्षण देणे पाप समजले जायचे. ती व्यवस्था उद्ध्वस्त करून फुले दाम्पत्यांनी स्त्रियांना व शूद्र समजल्या जात असलेल्यांना शिक्षणाची दारे मोकळी करून दिली. त्यांनी हजारो वर्षांच्या व्यवस्थेला हादरा देऊन नवीन व्यवस्था जन्माला घातली व क्रांती घडवून आणली. त्यामुळेच सवित्रीमाई या क्रांतीज्योती आहेत असे प्रतिपादन कॉम्रेड कुमार मोहरमपुरी यांनी केले. राजूर येथे डीवायएफआय व राजूर विकास संघर्ष समितीद्वारे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कुमार मोहरमपुरी पुढे म्हणाले की आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षाच्या कालावधी लोटला. मात्र सरकारने शिक्षणाची जवाबदारी झटकून शिक्षणाचे बाजारीकरण करणे सुरु केले आहे. त्यामुळे सावित्रीमाईंनी अथक परिश्रमातून व त्यागातून उभारलेली सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मूठभरांच्या ताब्यात गेली आहे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था टिकवायची असेल तर संघर्ष करणे व शिक्षणाचे बाजारीकरण रोखणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
सर्वप्रथम कु. अनुष्का पेटकर, दीपिका साहू व लता पुनगंटी यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई यांच्या प्रतिमेला मेणबत्ती प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांचे व्य़ाख्यान झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ कुमार मोहरमपुरी तर प्रमुख पाहुणे म्हणून राहुल कुंभारे, पो पा सरोज मून, सागर नगराळे व जयंत कोयरे होते.
या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी कु अनुष्का पेटकर, दीपिका साहू, राजाराम प्रजापती, अमर्त्य मोहरमपुरी, वैभव मजगवळी, सुरज प्रसाद, प्रशिक नगराळे, कामेश भुसारी, प्रज्योत जंगमवार यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी DYFI व राजूर विकास संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.