वणीत रात्रीस चाललेल्या खेळामुळे खमंग चर्चेला उधाण

तरुणीवर दबाव? मध्यस्थी करणारे 'ते' पत्रकार व नेते कोण?

0

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी रात्रीस चाललेल्या खेळामुळे वणीत एकच खळबळ उडाली असून याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे. त्यातच वणीच्या ठाणेदारांची तडकाफडकी यवतमाळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने चर्चेला आणखीनच जोर आला आहे. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्यांनी सोशल मीडियावर विविध पोस्ट देखील टाकल्या. वणीतील दोन नेते आणि दोन पत्रकार हे तरुणीवर दबाव टाकत असल्याची माहिती समोर आल्याने ‘ते’ नेते आणि पत्रकार कोण याची चर्चाही वणीत रंगत आहे. दरम्यान आधीच्या मेडिकलमध्ये तरुणीला मारहाण झाली नसल्याचे समोर आले होते मात्र दुस-यांदा वैद्यकीय तपासणी केली असता तरुणीचा हाताला मार लागल्याचे समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी रात्री ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी एका तरुणीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यातच तरुणीसोबत झालेल्या भांडणात मध्यस्ती करण्यात गेलेल्या मनीष तुराणकर यानेही तरुणीवर मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दिली. हे प्रकरण घडताच वणीत चांगलीच खळबळ उडाली. सोबतच हे प्रकरण सोप्पे नसून अवघड असल्याचा सूरही सर्वसामान्यांमधून निघत आहे.

सोमवारी दुपारी 2 वाहताच्या सुमारास तरुणी व तिच्या वडीलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांची भेट घेत या प्रकरणात योग्य तो न्याय देण्याची मागणी केली. सदर प्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षक यांच्याकडून सुरू असून आणखी दोन दिवसांचा अवधी मागितल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान 3.30 वाजता पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आले. त्यांनी तरुणीची विचारपूस केली. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा व दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला. त्यामुळे वणी पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

‘ते’ पत्रकार आणि नेते कोण ?
या प्रकरणात तरुणीवर दोन पत्रकार, एका पक्षाचा शहर अध्यक्ष व काही राजकीय नेते दबाव आणत असल्याची चर्चा आहे. ते पत्रकार कोण? यांचा त्या प्रकरणाशी काय संबंध? हे या प्रकरणात का स्वारस्य घेत आहे? यांचे काही हितसंबंध आहे का? अशा विविध चर्चा दिवसभरात रंगल्या. पत्रकार व नेते या प्रकरणात मध्यस्तीची भूमिका का घेत आहेत? याबाबत विविध तर्क वितर्क लावल्या जात आहे.

सीसीटीव्ही फुटेज गायब ?
ठाणेदाराच्या घरी नेमके काय झाले याबाबतची माहिती जवळच लागलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे फूटेज गायब करण्याचा प्रताप केल्या जाऊ शकतो. त्यातच तरुणीचा मोबाईल हिसकावून घेतल्याची माहितीही समोर येत आहे. त्यातच तडकाफडकी बदली झाल्यानंतरही बाळासाहेब खाडे वणीत आहे. त्यामुळे ते अद्याप वणीत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

गुन्हा दाखल करण्यास विलंब का ?
पीडित तरुणीची महिलेची तक्रार नोंदविण्यास इतका विलंब का लागत आहे. पीडिता तरुणी वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास येत आहे. मात्र तिला दिवसभर बयानासाठी बसवून ठेवले जात आहे. आज घटनेचा तिसरा दिवस आहे. वैद्यकीय चाचणीत तरुणीला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. परंतु अद्यापही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे मनीष तुराणकर व ठाणेदारांनी केलेल्या तक्रारीवरून पीडितेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हे प्रकरण कोणत्या दिशेला जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.