अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी मध्यरात्री 12.30 वाजता कालवश झालेले सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व गोवा मुक्ती संग्राम सैनिक प्रल्हादपंत कृष्णराव रेभे यांच्यावर आज रविवारी 31 मार्च रोजी वणी येथील मोक्षधाममध्ये दुपारी 2.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
टागोर चौकातील त्यांच्या राहत्या घरून दुपारी एक वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या गाडीत ठेवण्यात आले होते. ही अंत्ययात्रा गांधीचौक, खाती चौक, शिवाजी चौक व आंबेडकर चौक अशी मार्गक्रमण करीत स्थानिक मोक्षधाममध्ये पोहोचली. अंत्ययात्रेच्या शीर्षस्थानी असलेला वाद्यवृंद देशभक्तीपर गीतांची धुन वाजवत होता. त्यामुळे अंत्ययात्रेतील वातावरण गंभीर देशभक्तीने भारले होते. अंत्ययात्रेत समाजातील सर्वच स्तरातील गणमान्य नागरिक सहभागी झाले होते.
मोक्षधाम येथे अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर पोलीस पथकाने प्रल्हादपंत रेभे यांना सलामी देऊन बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. शासनाच्या वतीने वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी प्रल्हादपंत रेभे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
अंत्यसंस्कारानंतर अखिल भारतीय सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष रामचंद्र एरपुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत माजी गटशिक्षणाधिकारी उत्तमराव गेडाम, ओंकारेश्वर गुरव, पिरिपाचे प्रा. पुरुषोत्तम पाटील, सामाजिक कार्यकर्त्या राणानुर सिद्धिकी, भाजप शहर अध्यक्ष रवि बेलूरकर, नारायणराव गोडे इत्यादींनी प्रातिनिधिक स्वरूपात शोकसंवेदना व्यक्त केल्या. शोकसभेचे संचालन गजानन कासावार यांनी केले. दरम्यान वणी शहरातील सुवर्ण व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाणे बंद ठेवली होती.
लिंकवर अंत्ययात्रेचा व्हिडीओ…