कान्हाळगावच्या मतदारांचा मतदानावर बहिष्कार

समस्या न सोडवल्याने घातला मतदानावर बहिष्कार

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील अतीदुर्गम भागात वसलेल्या कान्हाळगाव (वाई) इथल्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावातील एकाही मतदारांनी मतदान केले नाही. गावातील समस्या सोडवल्या न गेल्याने त्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे सर्वत्र मतदान शांततेत आणि सुव्यवस्थेत झाले असताना दुसरी कडे बहिष्काराच्या या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कान्हळगाव, वागदरा, वसंतनगर, दूरगडा अशी गट ग्रामपंचायत आहे. यात कान्हाळगाव (वाई) हे एक आदिवासी बहुल गाव आहे. या गावात रस्ते, शुद्ध पाणी, आरोग्य आदि मुलभुत समस्या गेल्या अनेक वर्षां पासून आहे. या आधी कान्हाळगावातील रहिवाशांनी आंदोलन करीत समस्या न सोडवल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर गावक-यांनी मतदानावर बहिष्कार टाकून मतदान न करण्याचा निर्णय घेतला.

गावक-यांनी गावाच्या प्रवेश स्थळीच पर्यत समस्यांचा निपटारा होत नाही तो पर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचा बोर्डच लावला आहे. यात लोकसभा तसेच विधानसभेतही बहिष्कार राहणार असा उल्लेख आहे. यागावाची लोकसंख्या सुमारे 375 असून या गावात 272 मतदार आहेत. तसंच हे गाव शासनाच्या पेसा अंतर्गत आहे.

गावाच्या प्रवेशद्वारावर लावलेला हाच तो बोर्ड

या गावात बहुंताश लोक हे अल्पभूधारक शेतकरी आहे. तसेच अनेकांचे जगण्याचे साधन हे मजुरी आहे. गावात दोन हॅन्ड पम्प असून त्यातील एक सुस्थितीत आहे. त्यामुळे गावात सध्या तरी पाण्याची समस्या नाही. मात्र खैरगाव ते कान्हाळगाव (वाई) तसेच भुरकी पोड ते कान्हाळगाव (वाई) असा अंदाजे साडेतीन कि.मी. अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षां पासून ख़राब आहे. विद्यार्थ्यांना जाण्या येण्या करीता हाच मार्ग आहे. पावसाळ्यात इथून प्रवास करणे कठीण होते.

गावक-यांनी गावातील समस्या अनेक वेळा आमदार, खासदार, जि. प. सदस्स तसेच प्रशासनाला कळवल्या, पण त्यांच्या मागणीकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना लोकप्रतिनिधींनी त्यामुळे अखेर त्रस्त होऊन आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गावक-यांनी वणी बहुगुणीला दिली. जर यापुढेही गावातील समस्या सोडवल्या गेल्या नाही तर विधानसभा निवडणुकीतही मतदानावर बहिष्कार असणार असा इशारा गावक-यांनी दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.