रोहण आदेवार, मार्डी: राळेगाव तालुक्यातील वडकी या सिमेंट महामार्गावरील सावंगी गावाजवळ २६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान विचित्र अपघात झाला. झायलो, टाटा मॅजिक व दुचाकी अशा तीन गाड्यांचा या महामार्गावर अपघात झाला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. महत्त्वाचं म्हणजे यातील दुचाकीस्वार लग्न समारंभासाठी राळेगावला जात होता. मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला.
नामदेवराव वांगे (५०) रा. आपटी तालुका राळेगाव हे आपल्या हिरो स्प्लेंडर दुचाकीने (एम.एच.२९ ए.वाय. ५९६२) घरून लग्न कार्यासाठी राळेगाव येथे जात होते. तर राळेगाव पासून टाटा मॅजिक (एम.एच. २९ आर. ६९७२) हे वाहन प्रवासी घेऊन राळेगावहून जात होते. नामदेवराव राळेगावला पोहोचणारच होते मात्र एक किलोमीटर आधीच सावंगी गावाजवळ भरधाव वेगाने जाणा-या मॅजिक गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात नामदेवराव वांगे हे जागीच ठार झाले.
अपघात घडताच सदर टाटा मॅजिक वाहनाच्या चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला व गाडीने महामार्गावर वडकी कडून राळेगावकडे जाणाऱ्या झायलो (एम.एच.३३ ए. ३३०६) या वाहनास सुद्धा धडक दिली. या अपघातात झायलो वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती राळेगाव पोलिसांना कळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठले व मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविला.
या तीन वाहनाचा विचित्र अपघात बघण्यासाठी घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पंधरा दिवसांपूर्वीच वडकी येथे झालेल्या कार आणि ऑटोच्या अपघातात पाच जण जागीच ठार तर सोळा जण गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा हा अपघात झाला आहे.