दिग्रसमध्ये ‘महात्मा फुले आरोग्य योजने’ अंतर्गत आरोग्य शिबिर

शेकडो रुग्णांची ग्रामीण रुग्णालयात तपासणी

0 253

दिग्रस (प्रतिनिधी): दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलतर्फे ग्रामीण रुग्णालय येथे ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत तपासणी शिबिर घेण्यात आले. हे शिबिर आज शनिवारी सकाळी 8 ते 12 दरम्यान झाले. यात शेकडो रुग्णांनी तपासणी केली. या योजनेअंतर्गत पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला विविध रोग व आजारांवर वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहे.

सकाळी सुरू झालेल्या या शिबिरात दिग्रस तसेच परिसरातील रुग्णांनी हजेरी लावली. यावेळी आलेल्या रुग्णांची आरोग्यधाम हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. तसेच ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ याबाबत सविस्तर माहिती दिली. या योजनेचा लाभ घेण्याबाबत रुग्णांना मार्गदर्शनही करण्यात आले. या योजनेत डायलिसीस, मेंदुविकार, हृदयरोग, हाडांचे आजार, किडनीचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महागड्या शस्त्रक्रिया यांचा समावेश असून रुग्णांना मोफत औषधीही दिली जाते.

यावेळी आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. शाम जाधव म्हणाले की…

आपल्या भागात मोठ्या प्रमाणात गरीबी आणि दारिद्र्य आहे. पैशाअभावी अनेक गंभीर आजारावर रुग्णांना योग्य तो उपचार मिळत नाही. मात्र “महात्मा फुले जन आरोग्य योजना” सुरू झाल्याने रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. या योजनेत ७२१ प्रकारच्या आजारांचा समावेश आहे. कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये यासाठी या योजनेची माहिती अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवावी. असे आवाहनही डॉ. जाधव यांनी केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ प्रशांत रोकडे, डॉ श्याम जाधव (नाईक), डॉ संदीप दुधे, डॉ आशिष शेजापाल, डॉ श्रीकृष्ण पाटील यांच्यासह हॉस्पिटलच्या चमुनी परिश्रम घेतले.

Comments
Loading...