विराट कोहलीला बीसीसीआयचा नोकरी सोडण्याचा आदेश
विराट कुठे आहे नोकरीला ? का सोडावी लागणार विराट कोहलीला नोकरी ?
मुंबई: टीम इंडियासाठी विराटने केलेल्या कामगिरीमुळे त्याला सरकारकडून ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच ओएनजीसीमध्ये नोकरी देण्यात आली. पण आता तिच नोकरी विराटला सोडावी लागणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला बीसीसीआयने फर्मान बजावलं आहे. विराट कोहली ओएनजीसीमध्ये मॅनेजर या पदावर आहे.
‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’च्या मुद्द्यावरुन यापूर्वी सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या खेळाडूंना अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता विराट कोहलीला नोकरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारी किंवा खासगी कंपन्यांशी करारबद्ध असलेल्या क्रिकेटर्सना त्यांची नोकरी सोडायला सांगा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला दिला होता. त्यानुसार क्रिकेट प्रशासक समितीने, कोणताही क्रिकेटर सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणार नाही, असं बोर्डाला स्पष्ट शब्दात सांगितलं.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानुसारच आता विराटला ओएनजीसीतील त्याची नोकरी सोडावी लागणार आहे. कोहलीने स्थानिक क्रिकेट मॅचमध्ये ओएनजीसीचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे त्याची वर्णी ओएनजीसीच्या मॅनेजरपदी लागली होती. पण आता ती कंपनी विराटला सोडावी लागणार आहे.
(आता रेल्वेतील खानपान राहणार ऐच्छिक)
बीसीसीआयच्या या फर्मानाचा परिणाम गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, इशांत शर्मा या दिल्लीतील खेळाडूंवर जास्त होणार आहे. याच कारण म्हणजे टीम इंडियासाठी खेळताना इतर खासगी कंपन्यांमधील नोकरीतून जास्त कमाई होते. कॅप्टन कोहलीशिवाय अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासह इतर खेळाडूंनाही बीसीसीआयने नोकरी सोडण्याचे आदेश दिले आहेत.