पाणीटंचाईवर उपाययोजना करा, आमदारांचे निर्देश

झरी पंचायत समितीत आमदारांची आढावा बैठक

0
सुशील ओझा, झरी: तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शासन पातळीवर मोठ्या उपाययोजना कराव्या लागत आहे. या अनुषंगाने झरी पंचायत समितीच्या सभागृहात ७ जून रोजी पाणीटंचाईची आढावा बैठक आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत आ. बोदकुरवार यांनी ग्रामपंचायतच्या सचिवांना पाणीटंचाई संदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी वनजमिनीचे पट्टे वाटप करून महिलांना अर्थसाहाय्य निधीचा धनादेश वाटप करण्यात आले.
तालुक्यातील ज्या गावात पाणीटंचाई आहे, तेथे उपाययोजना करून पाणीटंचाईची समस्या निकाली काढावी, असे निर्देशही आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिले आहे. ज्या गावात पाणीटंचाई भासल्यास त्वरित टँकरने पाणीपुरवठा करा. तालुक्यात सध्या एकाही गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. ज्यामुळे तालुका टँकरमुक्त असला तरी येत्या १५ दिवसांत पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई भासू शकते. त्यामुळे सचिवाने विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारकांचे वनजमीन पट्टे प्रलंबित होते. अशा लोकांना आ.बोदकुरवार यांच्या हस्ते वनजमीन पट्ट्याचे वाटप करण्यात आले. विधवा महिलांना राष्ट्रीय अर्थसाहाय्य योजनेचे चेकसुद्धा वाटप करण्यात आले. आढावा बैठकीचे अध्यक्ष आ. संजीवरेड्डी बोदकुरवार होते.
मंचावर तहसीलदार अश्विनी जाधव, पंचायत समिती सभापती लता आत्राम, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, पं. स. उपसभापती नागोराव उरवते, मुन्ना बोलेनवार, सुरेश मानकर, सतीश नाकले, श्याम बोदकुरवार, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर,महादेव गोल्हर, पं. स. सदस्य राजेश्वर गोंद्रवार, धर्मा आत्राम होते तर विस्तार अधिकारी इसळकर, बांधकाम अभियंता बालसरे, पाणीपुरवठा अधिकारी मानकर, नितीन पदमलवार, जय बोरीकर व तालुक्यातील मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, तलाठीसह अनेक ग्रामवासी उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.