वणी ते राजुरा (शिंदोला मार्गे) बससेवेला प्रारंभ

प्रवाशांची होणार आर्थिक बचत

0
विलास ताजने, वणी:  वणी बसआगारातून शिंदोला मार्गे राजुरा बस सेवा सुरू करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. सदर मागणीला वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजुऱ्याचे आमदार ऍड. संजय धोटे यांनी दुजोरा दिला. संबंधितांनी मागणीची दखल घेत सदर बस सेवेला नुकताच प्रारंभ केला आहे.
सदर बस सेवा वणी वरून दररोज सायंकाळी पाच वाजता शिंदोला मार्गे आवाळपूर, गडचांदूर, राजुरा जाणार आहे. आणि राजुरा येथून याच मार्गाने सकाळी सात वाजता वणी करीता निघणार आहे. कोरपना तालुक्यातील नांदा बिबी, आवाळपूर, अंतरगाव, कढोली, नारंडा आदी ग्रामस्थांना वणी येथे ये-जा करण्यासाठी शिंदोला मार्ग कमी अंतराचा आहे. परंतु सदर मार्गे पूर्वी बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना कोरपना मार्गे वणी गाठावी लागत होती. परिणामी प्रवाशांना अधिकच आर्थिक भुर्दंड, शारीरिक त्रास सोसावा लागत होता. सदर बाब लक्षात घेऊन भाजयुमोचे चंद्रपूर जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार संजय धोटे यांच्यासह महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे मागणीचा पाठपुरावा केला होता.
सदर बससेवा सुरु झाल्याने नारंडाचे सरपंच वैशाली गेडाम, उपसरपंच अनिल शेंडे, वनोजाचे सरपंच सविता पेटकर, हिरापूरचे सरपंच प्रमोद कोडापे, सांगोडाचे उपसरपंच विजय लांडे, बंडू वडस्कर, सुरेश पळसुटकर, बाळा पंदीलवार, अजय तिखट, प्रवीण हेपट, अरविंद खाडे, अरुण जिरे, गजानन पाचभाई, अमोल भोंगळे, गजानन मोरे आदींनी आमदार बोदकुरवार, आमदार धोटे आणि परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. सदर बससेवा अखंडित सुरू राहण्यासाठी प्रवाशांनी सदर बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आशिष ताजने यांनी केले आहे. तर ही बस राजुरा नाही तर गडचांदुर पर्यंत असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.