शेतकरी व कामगारांसाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही: छाजेड
इंटकच्या अधिवेशनात विविध ठराव संमत
राजू कांबळे, वणी: शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या पाच वर्षांत तर सरकारने शेतकरी व कामगारांकडे दुर्लक्ष केलंच, मात्र या बजेटमध्येही सरकारने शेतकरी व कामगार वर्गाला केवळ वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहे. हे सरकार शेतकरी व कामगारांकडे कायमच दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन इंटकचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केले. रविवारी 7 जुलै रोजी वणी येथील शेतकरी मंदिर येथे राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) जिल्हा अधिवेशन झाले. या अधिवेशनात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
या एस क्यू झामा, आ. डॉ. वजाहत मिर्झा, चारुलता टोकास, माजी आ. वामनराव कासावार, रवींद्र यावलकर, सुदामजी महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन देवीदास काळे यांनी केले होते. या कार्यक्रमात पाणी पुरवठा, वीज पुरवठा, वन्यप्राणी पासून शेतात होणारे नुकसान भरपाई, कोळसा कंपनीत स्थानिकांची भरती, शेतमाला योग्य भाव मिळावा इत्यादी विषयांवर ठराव मांडण्यात आला. तसेच शेत मजुरांविषयीही ठराव मांडण्यात आला.
यावेळी देवीदास काळे म्हणाले की इथे स्थानिकांच्या रोजगारांचा मोठा प्रश्न आहे. कोळसा खाणीसाठी स्थानिकांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे त्या शेतावर काम करणारा शेतमजूर बेरोजगार झाला आहे. त्यांना कंत्राटीपद्धतीवर काम देण्याऐवजी परप्रांतियांना रोजगार दिला जात आहे. परिसरात रिलायन्स आणि बिर्ला सारख्या कंपन्या सुरू झाल्या आहेत. मात्र इथेही स्थानिकांना डावलून इतरांनाच नोकरी दिली जात आहे. स्थानिकांना व मजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन होणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.
बाळू धानोरकरांनी आता मोठं आंदोलन करावं
कोळसा खाणीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. मात्र त्या भागाच्या विकासासाठी सीएसआरचा फंड खर्च केला जात नाही. आता बाळू धानोरकर हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. एक खासदार म्हणून त्यांच्याकडे हा निधी येतो. हा निधी योग्य प्रकारे खर्च करून व प्रदूषण व स्थानिकांच्या रोजगारांच्या प्रश्नांवर नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांनी मोठं आंदोलन करून ते काँग्रेसचे आहेत असं सिद्ध करावं, असं छाजेड म्हणाले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी शेतमजूर व इंटकचे सदस्य उपस्थित होते.