सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव म्हणून अडेगावची ओळख आहे. या गावातील सर्वसामान्य जनतेपासून तर शालेय विद्यार्थी ऑटोने प्रवास करतात. हा प्रवास जीवघेणा ठरणार असून, याकडे पोलिसांनी अर्थपूर्ण संबंधामुळे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. .
अडेगाव ते मुकुटबन मार्गावर अडेगाव येथील तीन, चार प्रवासी ऑटो चालवित असून, काही ऑटो शालेय विद्यार्थी शाळेत सोडणे व परत आणण्याचे काम करतात. इतर ऑटो अवैध वाहतूक करीत आहे. नियमाने ऑटोचालकाला प्रवासी क्षमता ठरवून देण्यात आली आहे.
मात्र एकही ऑटोचालक नियमांचे पालन न करता १२ ते १५ प्रवासी कोंबून भरून तसेच शाळकरी विद्यार्थी लटकून वाहतूक करीत आहे. ऑटोचालक प्रवाशांसह भाजीपाल्याची पोते, किराणा सामान, कोंबड्या आदींचीही वाहतूक करीत आहे.
सदर ऑटो पोलीस स्टेशनच्या जवळून पोलिसांच्या डोळ्यासमोरून जात असूनही कारवाई शून्य असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अडेगाव येथील सर्वच ऑटोंमधून अशी वाहतूक होत असून, पोलीस आर्थिक संबंधामुळे गप्प असल्याची चर्चा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे..